नाशिक : केवळ लोकानुनयासाठी उभारलेली भरमसाठ उद्याने आणि त्या उद्यानांमध्ये खेळाचे साहित्य तसेच खेळणी बसविण्याचा अनाठायी सोस यामुळे होणारा कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक उद्याने तसेच क्रीडांगणांमध्ये बसविण्यात येणारे खळाचे साहित्य, खेळणींसाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा निकषांची पूर्तता बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात साडेपाचशेहून अधिक लहान-मोठी उद्याने आहेत. जागा दिसेल तेथे उद्याने उभारण्याचा लोकप्रतिनिधींनी लावलेला सपाटा उद्यानांच्या वाढत्या संख्येचे कारण ठरला आहे. उद्यानांमध्ये खेळणी तसेच क्रीडांगणांमध्ये खेळाचे साहित्य बसविण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र, दुसऱ्याच वर्षी या खेळणी वा खेळाचे साहित्य नादुरुस्त होते.
खेळणी, खेळाचे साहित्य आंतरराष्ट्रीय सुरक्षा निकषांची पूर्तता करणारे असावे.
प्लास्टिक साहित्य अत्यंत टिकाऊ, लवचिक व पर्यावरणास सुसंगत असावे.
अँटीस्लीप पृष्ठभाग, गोलसर किनारे व बिनविषारी रंग असावे.
जलरोधक, साफसफाईस सुलभ व इनडोअर, आउटडोअर वापरासाठी योग्य असावे.
पावडर कोटिंग व शॉर्ट ब्लास्टिंग प्रक्रिया केलेले टिकाऊ व सुरक्षित अशी खेळणी असावी.
स्विंग चेनवर रबर कोटिंग केलेले असावे.
खेळणी दिव्यांग सुलभ असतील याची दक्षता घ्यावी.
राज्यातील महापालिका, नगर परिषदांना विविध योजनांमधून उद्याने, क्रीडांगण उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. सार्वजनिक उद्यानातील साहित्यातून मुलांमध्ये आत्मनिर्भरता, आत्मविश्वास, सामाजिक समावेशन व सहकार्याची भावना वृद्धिंगत होत असल्याने सदर साहित्य शारीरिक शिक्षण, योग व समावेशक क्रीडा कार्यक्रमांमध्ये वापरण्यायोग्य, विविध वयोगटांतील व क्षमतांतील मुलांसाठी सुसंगत, दीर्घायुषी, सुरक्षित, सर्वसमावेशक व कमी देखभाल खर्चाचे असणे अपेक्षित आहे. सार्वजनिक उद्यानातील मुलांची खेळणी गुणवत्ता मानके व दिव्यांग मुलांच्या गरजांची पूर्तता करणे आवश्यक असल्याने याबाबत मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत.