नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट- गण आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले असताना, ग्रामविकास विभागाने राखीव जागांचे चक्रीय आरक्षण संपुष्टात आणून नव्याने आरक्षण सोडत काढणार असल्याचे परित्रक काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सहा तालुक्यांतील गट हे आदिवासींसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. तर, निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, चांदवड या तालुक्यातील गट सर्वसाधारण व ओबीसीसाठी राखीव होऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दिवाळीनंतर होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमध्ये यंदा ग्रामविकास विभागाने मोठा बदल केल्याने नव्याने आरक्षण सोडती निघणार आहेत. हे त्या गटाच्या लोकसंख्येवर आधारित असणारे आरक्षण असणार असल्याने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गटात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व बागलाण हे तालुके आदिवासी तर, निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, चांदवड, नाशिक व देवळा हे तालुके (बिगर आदिवासी) सर्वसाधारण आहेत. यातही नाशिक, देवळा, बागलाण या तालुके आदिवासी व सर्वसाधारण लोकसंख्येचे आहे. यापूर्वी चक्राकार पद्धतीने आरक्षण निघत असल्याने आदिवासी तालुक्यांमधील गट राखीव तसेच खुलेदेखील झाले होते.
काही वेळेस ओबीसी गटदेखील झाले होते. त्यामुळे या भागातील सर्वसाधारण, ओबीसींना जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची संधी मिळत होती. परंतु, आता लोकसंख्येप्रमाणे उतरत्या क्रमाने आरक्षण निघणार असल्याने या तालुक्यांमधील बहुतांश गट हे राखीव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील गटांवर आदिवासी सदस्यांचे प्राबल्य राहू शकते.
बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये चक्राकार पद्धतीत गट राखीव होत होते तर, कधी ते खुले राहत असे. मात्र, आता या तालुक्यांमधील बहुतांश गट हे खुले, ओबीसी निघण्याची शक्यता अधिक आहे. नाशिक, देवळा, बागलाण तालुक्यात दोन्ही प्रवर्गातील लोकसंख्या असल्याने या तालुक्यांमध्ये नेमके आरक्षण कसे निघणार यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सप्टेंबर महिन्यात आरक्षण सोडत
जिल्हा परिषद व पंचायत समितीची गट-गण रचना आता अंतिम झाली असून, इच्छुक उमेदवारांना आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत. या महिनाअखेर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अथवा गणेश विसर्जनानंतर त्वरित आरक्षण सोडत काढली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.