नाशिक

नाशिक : औद्योगिक महामार्गामुळे धार्मिक काॅरिडाॅरला बळ

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या सुवर्णत्रिकोणातील नाशिक व पुणे ही शहरे औद्योगिक द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे सुवर्णत्रिकोण पूर्णत्वास येणार आहे. तसेच भविष्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर शिर्डी व सप्तश्रृंगगड धार्मिक काॅरिडॉरला बळ मिळून या भागातील पर्यटनवाढीस चालना मिळेल.

राज्यातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक अव्वलस्थानी आहे. समृद्धी एक्स्प्रेस-वे तसेच प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत असतानाच शासनाने नाशिक ते पुणे असा औद्योगिक द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प नाशिकसाठी गेमचेंजर ठरणार आहे. प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे नाशिक-नगर-पुणे या भागाची आर्थिक भरभराट होईल. त्यासोबतच नाशिक व नगर जिल्ह्यांतील धार्मिक पर्यटनालाही सुगीचे दिवस येणार आहेत.

सिंहस्थ कुंभनगरी असलेल्या नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरसह साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंगगड आणि साईबाबांची शिर्डी येथेही वर्षभर भक्तांचा राबता असतो. देश-विदेशांमधून भाविक या चारही ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु, अवघ्या दीडशे किलोमीटरच्या परिघात असूनही या सर्व ठिकाणचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून म्हणावा तसा विकास आजही झालेला नाही. त्यामुळे शासनाने पुढाकार घेत या चारही स्थळांचा धार्मिक कॉरिडॉर तयार करून त्याअंतर्गत भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास या दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगिण विकासाला हातभार लागेल. त्यासोबत पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून लाखो राेजगार उपलब्ध होतील.

नाशिकचे महत्त्व जगभरात
प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीला सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा आहे. शहरात श्री काळाराम, श्री कपालेश्वरसह हजारो लहान-मोठी मंदिरे असून, दरवर्षी लाखो भाविक रामकुंडात स्नानासाठी येतात. तसेच गेल्या काही वर्षांत नाशिक शैक्षणिक, आराेग्य हब म्हणून पुढे आले असून, औद्योगिक क्षेत्रातही घोडदौड कायम आहे. एवढेच नव्हे तर जगभरात नाशिकची ओळख वाइन कॅपिटल म्हणून पोहोचली आहे.

त्र्यंबकेश्वरी कुंभमेळा
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान त्र्यंबकराजामुळे त्र्यंबकची व पर्यायाने नाशिकची ख्याती जगभर पोहोचली आहे. दर १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा, संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर, जवळच असलेले अंजनेरीचे स्थान तसेच त्र्यंबकनगरीला लागून असलेला निसर्गरम्य परिसर यामुळे धार्मिकतेसोबतच अन्य पर्यटनालाही चालना मिळू शकते.

सप्तश्रृंगगड ८१ कोटींचा आराखडा
साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंगगडावर नाशिकसह राज्यभरातून तसेच गुजरात व मध्य प्रदेशामधून लाखाे भाविक येत असतात. पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून शासनाने गडाच्या विकासासाठी ८१ कोटींचा आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गडाचा कायापालट लवकरच होणार आहे.

शिर्डीचे महत्त्व जगद्विख्यात
श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबा यांच्यामुळे शिर्डीचा नावलौकिक जगद्विख्यात आहे. देश-विदेशांतील लाखाे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शासनातर्फे शिर्डीच्या विकासासाठी आजपर्यंत कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे. मात्र, धार्मिक काॅरिडॉर उभा राहिल्यास शिर्डी व पर्यायाने आजूबाजूच्या परिसराचा विकासाला बूस्ट मिळेल.

कृषी, मेडिकल टुरिझमला वाव
रस्ते, रेल्वे व हवाई कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या विकासाला वेग आला आहे. प्रस्तावित सुरत-चेन्नई व नाशिक-पुणे द्रुतगती महामार्गामुळे जिल्ह्याची आर्थिक भरभराट होण्यास मदत मिळेल. त्यासोबत शासनाने नाशिकच्या आजूबाजूची पोषक हवा बघता मेडिकल टुरिझमला मोठा वाव आहे. तसेच कृषिप्रधान असलेल्या नाशिकमध्ये कृषी पर्यटनही चांगल्या पद्धतीने बहरल्यास त्यातून वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल होईल. याव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर परिसरातील योग विद्यापीठ, मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील प्रस्तावित फिल्म इंडस्ट्रीचाही फायदा भविष्यात नाशिकला होईल.

पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. सप्तश्रृंगगडावरील अनेक कामे मार्गी लागली आहेत. नाशिक, त्र्यंबक, शिर्डी व सप्तश्रृंगगड अशा कॉरिडॉरमुळे भविष्यात पर्यटनवाढीला अधिक चालना मिळू शकेल. – जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT