नाशिक : इंदिरानगर बोगद्याच्या रुंदीकरणाचे काम पुन्हा एकदा रखडले आहे. यामागे राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक स्तरावरचे मतभेद कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. या रुंदीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, कामाला सुरूवात न झाल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. या रुंदीकरणास विरोध कुणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राणेनगर बोगद्याचे रुंदीकरण नागरिकांच्या आंदोलनानंतर आणि लोकप्रतिनिधींच्या एकमताने युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. परंतु, त्याच मार्गावरील काही अंतरावर असलेल्या इंदिरानगर बोगद्याच्या रुंदीकरणासाठी राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींत एकवाक्यता नसल्याने हे काम रखडले आहे. परिणामी, या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत आहे. स्थानिक नागरिकांच्या एका गटाने या बोगद्याचे रुंदीकरण होऊ नये, यासाठी निवेदन सुद्धा दिल्याचे समजते. काही लोकप्रतिनिधींनी कामासाठी प्रयत्न केले असले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे सध्या हे काम थांबवण्यात आले आहे. २५ ऑक्टोबरला इंदिरानगर बोगद्यावरील वाहतूक बंद करत रुंदीकरणाचे काम सुरू करण्याची अधिसूचना पोलिस उपायुक्त किरिथीका सी. एम. यांनी जारी केली होती. मात्र, दोन आठवडे उलटूनही महामार्ग विभाग किंवा ठेकेदार कंपनीकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबत मतभेद असल्याने काम ठप्प असल्याचे सांगितले जाते. महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीकडून 'उद्यापासून काम सुरू होईल' असे तीन ते चार वेळा सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही प्रगती झालेली नाही.
बोगदा रुंदीकरणाचे काम ज्या कंपनीला मिळाले आहे, त्या कंपनीकडून मुळातच मोठ्या प्रमाणात विलंब झाला आहे. त्यातच स्थानिक काही गटाचा विरोध असल्याने या रुंदीकरणास खोडा निर्माण झाला आहे. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात लाखो भाविक येणार असल्याने वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी इंदिरानगर बोगद्याचे रुंदीकरण अत्यावश्यक मानले जात आहे. महामार्ग विभागाने राणेनगर बोगद्याचे रुंदीकरण फक्त दोन महिन्यांत पूर्ण केले होते. इंदिरानगर बोगद्याचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू झाले असते तर जून २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, आता दोन आठवडे उलटूनही काम सुरू झाले नसल्याने 'अखेर हे रुंदीकरण कधी सुरू होणार' हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.