नाशिक

नाशिक : ओझरसह त्र्यंबक, सिन्नर पोलिस आयुक्तालयांत समावेशाच्या हालचाली गतिमान

अंजली राऊत

[author title="ओझर : मनोज कावळे" image="http://"][/author]
तब्बल दीड दशकापासून प्रलंबित ओझर पोलिस ठाण्याचा नाशिक पोलिस आयुक्तालयात समावेशाच्या हालचाली पुन्हा एकदा गतिमान झाल्या आहेत. दि.१४ जूनपर्यंत ओझरसह नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या पोलिस ठाण्यांची सविस्तर माहिती पोलिस महासंचालक यांनी तातडीने मागवली असून, येत्या पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या १५ वर्षांपासून ओझरसह नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या पोलिस ठाण्यांचा नाशिक पोलिस आयुक्तालयात समावेशाचा प्रस्ताव धूळ खात पडलेला आहे. २०२० मध्ये गृहमंत्रालयाने या बाबत अंतिम प्रस्तावदेखील तयार केला होता. त्यानुसार १ मे २०२० रोजी घोषणा होण्याची दाट शक्यता असतानाच कोरोना महामारीने खोडा घातला. परंतु, पोलिस महासंचालकांनी याबाबत दोन दिवसांपूर्वीच पुन्हा नव्याने माहिती मागवल्याने आता या पोलिस ठाण्यांचा नाशिक पोलिस आयुक्तालयात समावेश होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

..म्हणून प्रस्ताव धूळ खात

देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला मिग विमान कारखाना, वायूसेनेचा तळ यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांमुळे ओझर येथे अतिमहत्त्वाच्या लोकांचा कायमच राबता असतो. १५ वर्षांपूर्वी गृहमंत्रालयाने ओझरचे वाढते शहरीकरण व इतर महत्त्वाच्या बाबी लक्षात घेत ओझर पोलिस ठाण्याचे नाशिक पोलिस आयुक्तालयात समावेश करावा, असा प्रस्ताव शासनास सादर केला होता. परंतु, नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांसह समावेश करण्यास ग्रामीणच्या ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विरोध केल्याची चर्चा झाल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडला होता.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय अपेक्षित

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. तेव्हाचा पोलिस बंदोबस्त आदी नियोजनाच्या दृष्टीने कुंभमेळ्यापूर्वीच पोलिस ठाण्यांबाबत तातडीने निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

….यांचा होणार समावेश

नाशिक पोलिस आयुक्तालयात ओझरसह नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या पोलिस ठाण्यांचा, तर ओझर पोलिस ठाण्याअंतर्गत येणारे ओझर शहर, एचएएल, दीक्षी, बाणगंगानगर यांच्यासह दिंडोरी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेले जानोरी, जवुळके तसेच विमानतळ आणि सध्या नाशिक तालुका पोलिस ठाणेअंतर्गत असलेले सिद्धपिंप्री या गावांचा समावेश होणार आहे. तसेच सिन्नर पोलिस ठाणे हद्दीतील ४० गावांचादेखील समावेश पोलिस आयुक्तालयात होणार आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT