नाशिक : गौरव अहिरे
राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ जानेवारी ते २६ डिसेंबर दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करीत दोन हजार ६०७ संशयितांची धरपकड केली. त्यांच्याकडून पथकांनी सात कोटी ८३ लाख १० हजार ३५७ रुपयांचा अवैध मद्यसाठा व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये दोन हजार ५८९ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी फक्त एका गुन्ह्यात बेवारस मुद्देमाल आढळला आहे, तर उर्वरित गुन्ह्यांमध्ये वारस सापडल्याने पोलिसांनी दोन हजार ६०७ संशयितांची धरपकड केली. त्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात विभागास यश आले आहे. चालू वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याचे पाहावयास मिळाले.
लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूक काळात ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील दुर्गम भागात छापेमारी करीत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. तसेच लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा छडा लावला होता. या कारवाईदरम्यान, संशयितांचा पाठलाग करताना संशयितांनी अपघात करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याचा खून केला होता. त्यानंतर पोलिसांसह विभागाने आक्रमक कारवाई करीत संशयितांची धरपकड केली होती.
दाखल गुन्हे - २,५९०
पकडलेले संशयित - २,६०७
जप्त वाहने - १५७
जप्त मुद्देमाल - ७ कोटी ८३ लाख १० हजार ३५७ रुपये