नाशिक : नाशिक विभागाचे अपर विभागीय आयुक्त नीलेश सागर, नाशिक जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष गीतांजली बाविस्कर व नंदुरबार जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अर्जुन चिखले यांना केंद्र शासनाने आयएएस पदावर बढती दिली आहे. राज्यात येत्या एक ते दोन दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्तीसाठी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागेल.
केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील २३ अधिकाऱ्यांना आयएएसपदी पदोन्नती दिली आहे. केंद्र सरकारचे सचिव संजय चौरसिया यांनी सोमवारी (दि.१४) या संदर्भात आदेश काढले असून, आयएएस (बढतीवर नियुक्ती) कायदा 1955 नुसार ही बढती देण्यात आली आहे. सागर हे नाशिकला विभागीय आयुक्तालयात अपर आयुक्तपदी कार्यरत आहेत. प्रारंभी धुळे व जळगाव येथे प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर सन १९९७ ला धुळे येथे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आजपर्यंत त्यांनी सरदार सरोवर प्रकल्प सचिव, जळगाव महापालिकेत उपआयुक्त, अंमळनेर उपविभागीय अधिकारी, नाशिक महसूल प्रबोधिनीचे संचालक, नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे येथे करमणूक कर विभागाचे उपआयुक्त, नाशिकचे अपर जिल्हाधिकारी, अमरावतीचे अपर विभागीय आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
गीतांजली बाविस्कर यांनाही आयएएसपदी पदोन्नती मिळाली आहे. बाविस्कर यांनी १९९८ पासून महसूल प्रशासनात नियुक्ती करण्यात आली. जळगाव, नाशिक येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी, नाशिकमध्ये उपजिल्हाधिकारी प्रशासन, रोजगार हमी योजना तसेच निवडणूक, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी कोकण भवन, नाशिक महसूल प्रबोधिनी संचालक अशा विविध पदांवर कार्य केले आहे. गेल्या तीन वर्षापासून त्या नाशिकच्या जात पडताळणी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच नंदुरबारचे जात पडताळणी अध्यक्ष अर्जुन चिखले यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये २००६ ते २००९ मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होते. याशिवाय कोकण विभागात कार्यरत विवेक गायकवाड यांनाही आयएएसपदी बढती मिळाली आहे.