नाशिक : विहिरीच्या भरावात दबून पती-पत्नीचा मृत्यू  Pudhari Photo
नाशिक

नाशिक : विहिरीच्या भरावात दबून पती-पत्नीचा मृत्यू

नाशिक : विहिरीच्या भरावात दबून पती-पत्नीचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात शेतातील विहीर खचल्यामुळे दांम्‍पत्‍य मातीच्या ढिगार्‍याखाली दाबले गेले. तब्बल चार तास जेसीबीच्या मदतीने माती उपसल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

जोयदा शिवारात लाल माती जवळ मृत रेबा पावरा यांचे शेत आहे. ते शेतात पत्नी मीनाबाई पावरा यांच्या सोबत राहत होते. त्यांच्यासोबत आणखी काही कुटुंब देखील या ठिकाणी झोपडी करून वास्तव्यास होते. दोन दिवसांपासून या परिसरात दमदार पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे सकाळपासूनच रेबा आणि त्यांची पत्नी मीनाबाई हे शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी अचानक मिनाबाई यांच्या पोटात त्रास होऊ लागल्याने पावरा दांपत्य काही वेळ झोपडीत चहा पिण्यासाठी आले. चहा तयार करत असताना शेजारच्या झोपडीत राहणाऱ्या संतुबाई पावरा या त्यांचे पती भिकला पावरा आणि त्यांचा दीड वर्षाचा नातू तेजस हे झोपडी जवळ आले. याचवेळी अचानक विहिरीतून मोठा आवाज आल्याने रेबा व मिनाबाई पावरा हे दोघे विहिरीकडे पळाले. त्यावेळी विहिरीचा काही भाग ढासळत होता.

काही लक्षात येण्याच्या आतच रेबा आणि मिनाबाई पावरा ज्या भागात उभे होते तो विहिरीचा भाग देखील ढासळला. परिणामी दोघे पती-पत्नी मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. यावेळी उपस्थित असणाऱ्या भिकला पावरा यांनी जवळील रहिवाशांना मदतीसाठी आवाज दिला. त्यामुळे घटनास्थळावर मदत कार्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण विहिरीजवळील जागेला तडे पडत असल्यामुळे जमीन पुन्हा पुन्हा ढासळत होती. त्यामुळे या पती-पत्नींना वाचवण्यासाठी मोठ्या अडचणी आल्या. अखेर दीड तासानंतर जेसीबी मशीन घटनास्थळी आणण्यात आले. यानंतर माती उपसुन दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या घटनेची माहिती कळाल्याने गटविकास अधिकारी संजय सोनवणे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर व अन्य संबंधित घटनास्थळी पोहोचले. दरम्यान गेल्या डिसेंबर महिन्यातच बिरसा मुंडा योजनेच्या विहिरीचे बांधकाम झाले होते. सुमारे 25 ते 30 फूट खोल विहीर असून सध्या या विहिरीत पाणी नव्हते. मुरमाड जमिनीवर सदर विहीर बांधण्यात आली होती. मृताच्या झोपडी पासून पंधरा ते वीस मीटर अंतरावर ही विहीर तयार करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT