नाशिक : येत्या १८ ते २१ डिसेंबरदरम्यान नरेडको आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो-२०२५ नाशिकच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी व्यक्त केला. नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील बदल, संधी आणि भविष्याचा वेध घेत जयेश ठक्कर यांनी, नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील आमूलाग्र बदलांवर स्पष्ट भूमिका मांडली.
जयेश ठक्कर म्हणाले, गेली ३८ वर्षे मी या क्षेत्रात कार्यरत आहे. पूर्वी नाशिकमध्ये वन आरके, वन बीएचके किंवा जास्तीत जास्त टू बीएचकेपर्यंतची मागणी मर्यादित होती. त्या काळात संयुक्त कुटुंब पद्धती होती. एका घरात १० ते १५ सदस्य राहत असत. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नोकरीनिमित्त मुले बाहेरगावी, परदेशात जात आहेत. लहान कुटुंब पद्धती रूढ झाली असून, चार-पाच सदस्यांच्या कुटुंबाला अधिक प्रशस्त घर हवे आहे. त्यामुळे सध्या फोर बीएचके ते सेव्हन बीएचकेपर्यंतच्या फ्लॅट्सची मागणी सुद्धा झपाट्याने वाढत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास आराखडा तयार करण्यात आला असून, याकडे रिअल इस्टेट क्षेत्र आशादायी नजरेने पाहत असल्याचेही ठक्कर यांनी स्पष्ट केले. मुंबई व पुणे केवळ ३ ते ४ तासांच्या अंतरावर आहेत. समृद्धी महामार्गामुळे औरंगाबाद अडीच तासांवर, नागपूर साडेसहा तासांवर आले आहे. कनेक्टिव्हिटी वाढली की शहराचा विकास वेग घेतो. विशेष म्हणजे मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकमधील घरांचे दर अजूनही परवडणारे आहेत. भारत माता योजनेअंतर्गत प्रस्तावित नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे अनेक राज्यांना जोडणारा ठरेल. वाढवण बंदर असल्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रचंड वाढेल. सहा पदरी रस्त्यांमुळे प्रवास सुलभ होईल आणि नाशिकचा लॉजिस्टिक व औद्योगिक विकास झपाट्याने होईल.
लिव्हेबल आणि लव्हेबल शहर
'सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकसाठी पर्वणी आहे. जगातील चार कुंभक्षेत्रांपैकी महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण नाशिक आहे. या निमित्ताने केंद्र, राज्य सरकार आणि नाशिक महापालिका मिळून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची पायाभूत गुंतवणूक करणार आहेत. रस्ते, पूल, वाहतूक, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा सुविधा वाढल्या की रिअल इस्टेटची मागणी आपोआप वाढते. नाशिक हे 'लिव्हेबल' आणि 'लव्हेबल' शहर आहे, ही त्याची मोठी ताकद असल्याचेही जयेश ठक्कर यांनी सांगितले.