नाशिक : शहराची प्राचीन संस्कृती जपली जावी, या शुद्ध हेतूने धूलिवंदनाच्या दिवशी नाशिकमध्ये सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक 5 'वीर कुटुंबीयांचा सन्मान व पूजन' नाशिक सांस्कृतिक संवर्धन मंचच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी करण्यात येणार आहे. या सोहळ्यास सर्व नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माहिती माजी नगरसेवक तथा नाशिक सांस्कृतिक संवर्धन मंचचे सदस्य असलेल्या शाहू खैरे, अॅड. तानाजी जायभावे यांनी केले आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी धूलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी साजर्या होणार्या नाशिकमधील गोदाघाटावर वीर परंपरेतील प्रमुख पाच वीरांचा आणि वीर कुटुंबीयांचा सन्मान आणि पूजन करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी नाशिक सांस्कृतिक संवर्धन मंचातर्फे माध्यमांशी संवाद साधण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण भारतात साजर्या होणार्या 5 दिवसीय होलिकोत्सवाच्या दरम्यान होळीच्या दुसर्या दिवशी धूलिवंदनाच्या सायंकाळी नाशिक शहरातून वीर नाचविण्याची सुमारे 400 वर्षांची परंपरा साजरी केली जाते. होळीच्या दुसर्या दिवशी नाशिकमधील मोरे, बेलगावकर, भागवत (दाजीबा वीर), दुसाने आणि सहाणे परिवारातील ज्या वीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढाईमध्ये प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण म्हणून वीर नाचविण्याची परंपरा आहे. छत्रपतींच्या मावळ्यांच्या पोशाखात या वीरांची घरापासून गोदाघाटापर्यंत मिरवणूक काढली जाते. गोदाघाटावर खंडोबाचे दर्शन आणि आंघोळ करून वीर परतात. घरी नैवेद्य दाखवून तळी भरली जाते. आजच्या आधुनिक युगात नाशिकमधील तरुणांचा या परंपरांची माहिती होणे गरजेचे आहे त्यासाठी वीरांचा सन्मान गोदाघाटावरील संत गाडगे महाराज पुलाजवळील मुक्तेश्वर पटांगणावर करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याला नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी अॅड. तानाजी जायभावे, सुनील भायभंग, देवानंद बैरागी, अजय बोरस्ते, यनित वाघ, बाबासाहेब भोसले, महेश जोशी, अर्जुन टिळे, अनिल ढिकले आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.