Cylinder Blast 
नाशिक

Cylinder Blast | नाशिकमध्ये भीषण आग! सिलिंडरच्या स्फोटाने सहा घरे जळून खाक

Cylinder Blast | शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत घरातील रोकड आणि संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली.

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

हिरावाडीतील कॅनॉल रोडवरील कोळीवाड्यात मंगळवारी (दि. २४) सकाळी घराला आग लागून नंतर झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात सहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि पूर्णपणे खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत घरातील रोकड आणि संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली.

सहाही घरांतील रहिवाशांनी वेळीच बाहेर धाव घेतल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. हिरावाडीसमोरील कोळीवाडा हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. मंगळवारी सकाळी डीपीला लागून असलेल्या घरात अचानक आग लागली. सुरुवातीला दोन ते तीन घरांपर्यंत मर्यादित असलेली आग काही क्षणांतच वाढली.

आगीने वेढलेल्या घरातील गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि परिसरात एकच घबराट पसरली होती. शांताबाई जाधव, सुनीता जाधव, आशा मिरजकर, मीनाबाई मोरे, मोहन धोत्रे, नर्मदाबाई इंगोले यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची तीव्रता वाढत असल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, हर्षद पटेल, लीडिंग फायरमन विजय शिंदे, जवान नितीन मस्के, संदीप जाधव, ज्ञानेश्वर पाटील, हर्षद वाघ यांच्यासह १५ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवानांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले.

परंतु, तोपर्यंत सहा घरे पूर्णपणे जळाली होती. पंचवटी पोलिसांनी पंचनामा केला असून, आगीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक गौरव गोवर्धने, जुई शिंदे आणि प्रियंका माने घटनास्थळी येत आगीचा फटका बसलेल्या सहा कुटुंबांची भेट घेत त्यांना धीर दिला.

आगीत ज्यांची घरे जळाली, ती सर्व कुटुंबे अत्यंत सामान्य आणि गरीब आहेत. त्यांचा संसार आगीमुळे उघड्यावर आला असून, मोठे नुकसान झाले आहे. प्रशासकीय स्तरावर मदतीसाठी पाठपुरावा करणार आहे.
- गौरव गोवर्धने, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ३
आगीमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला असून, घटनेची माहिती मिळताच नगरसेवक गौरव गोवर्धने यांनी आमची भेट घेत १० हजार रुपयांची प्रत्येकी मदत केली. मात्र आमचे जीवन उघड्यावर आले असून, प्रशासनातर्फे आमचे पुनर्वसन व्हावे.
- सुनीता जाधव, स्थानिक पीडित महिला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT