नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि समन्वय केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने नाशिक रोड रेल्वेस्थानकाजवळ 40 एकर जागेवर मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याची घोषणा झाली आहे.
मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब या प्रकल्पात तळमजल्यावर न्यू मेट्रो, रेल्वे, हायस्पीड रेल्वे, शहर बस टर्मिनस, तर वरच्या मजल्यांवर हॉस्पिटल, शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स आणि आयटी पार्क अशी संकल्पना आहे.
हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत उभारला जाणार असून, रेल्वे, नाशिक महानगरपालिका आणि एसटी महामंडळाच्या जागेच्या संयुक्त वापरातून साकारला जाईल. पंतप्रधान कार्यालयाने कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हा प्रकल्प आणि नाशिक विमानतळ विस्ताराचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पाची प्रगती जाणून घेण्यात आली. मंजुरी आणि निधीची तरतूद यांसारख्या प्रारंभिक टप्प्यांवर काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.