Rain Alert (Pudhari File Photo)
नाशिक

Nashik News | नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट; 1 ऑगस्ट रोजी शाळा - महाविद्यालये बंद!

जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती आणि भूस्खलनाची तीव्र शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी व्यापक उपाययोजना जाहीर केल्या असून, आठ तालुक्यांतील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये शनिवारी (दि. १) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले की, हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांनी जिल्ह्यात काही भागांत जास्त पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटीसदृश घटना, पूर आणि भूस्खलनाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांच्या एकमताने निर्णय घेण्यात आला. या बैठकीत नाशिक जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेला ‘रेड अलर्ट’ विचारात घेता शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या आठ तालुक्यांतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा, अनुदानित-विनाअनुदानित तसेच खासगी शाळा आणि सर्व महाविद्यालयांना १ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यकतेनुसार उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आठवडी बाजार, जत्रा, मेळावे रद्द

बाजार- जत्रा स्थगित, स्थलांतर अनिवार्य वरील आठ तालुक्यांतील सर्व आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि मोठ्या सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी स्थगित करण्यात आले आहेत. महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायती यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सखल, पूरप्रवण व भूस्खलनाच्या धोक्याच्या भागातील नागरिकांचे शंभर टक्के सुरक्षित स्थळी स्थलांतर सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार निवारा केंद्रे सुरू करून अन्न, पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT