त्र्यंबकेश्वर (नाशिक) : तालुक्यातील वावी हर्ष येथील गर्भवती महिलेला वेळेत १०८ वा १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळाल्याने खासगी वाहनातच प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि.8) सकाळी प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने दोन्ही आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर महिलेच्या सासुबाई व आशा सेविकेने मिळून खासगी वाहनाने तिला त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यास सुरुवात केली.
सुमारे २० किमी अंतरावर पहिणे शिवारात पोहोचताच तीव्र प्रसुती वेदना वाढल्याने वाहन थांबवावे लागले. आशा सेविका आणि सासुबाईंनी तत्परतेने वाहनातच प्रसुती करून कन्यारत्नाचा जन्म घडवला. प्रसुती यशस्वी झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. नंतर आई व बाळाला त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बाळाचे वजन कमी असल्याने त्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेनंतर काही वेळाने १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचा संदेश प्राप्त झाला. या प्रकारामुळे ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी याबाबत राज्य सरकारकडे तक्रार दाखल करण्याची घोषणा केली आहे.