Harihar Fort Nashik New Rules For Trekkers
नाशिक : पावसाळी सहलीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने पर्यटकांसाठी नियमावली जारी केली आहे. पर्यटकांनी मद्यपान, हुल्लडबाजी किंवा इतरांना त्रासदायक ठरणारे वर्तन करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागाने दिला आहे. तसेच, हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या गटांना सहलीच्या किमान 72 तास आधी बुकिंग करणे अनिवार्य केले आहे.
पावसाळा सुरू होताच वर्षासहलीसाठी पर्यटक सज्ज झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात हरिहर गड, अंजनेरी गड, ब्रह्मगिरी, दुगारवाडी धबधबा, पहिने धबधबा, साल्हेर, मांगीतुंगी यांसारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र काही ठिकाणी काही पर्यटक गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास येते. अशा वर्तनामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो, तसेच प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले आणि धबधब्यांजवळ अनुचित वर्तन करणाऱ्यांवर पोलिस आणि वनविभागाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात वर्षासहलीसाठी जाणार्या पर्यटकांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
पर्यटकांसाठी नियमावली :
मद्यपान व हुल्लडबाजी टाळा.
सहलीपूर्वी हवामानाचा अंदाज आणि वनविभागाच्या चेतावण्या पहा.
पोलिस, वनरक्षक किंवा स्थानिक मार्गदर्शकांच्या सोबतच ट्रेक करा.
सुरक्षित, माहितीपूर्ण मार्गच निवडा; धोकादायक वाटा टाळा.
रेनकोट आणि प्राथमिक उपचार किट ठेवा.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंकरिता ड्रायबॅग वापरा.
हलके व ऊर्जा देणारे अन्न आणि पाण्याची बाटली जवळ ठेवा.
गटातच फिरा; परस्पर लक्ष ठेवा आणि मदत करा.
नद्या किंवा धबधब्याजवळ फक्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच जा.
स्थानिक आपत्कालीन क्रमांक व माहिती मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा.