नाशिक

नाशिक : आज विभागातील गुरुजींची परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शिक्षक मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी मतदान घेण्यात येणार आहे. विभागातील ६९ हजार ३६८ शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याकरिता विभागात ९० मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील २९ केंद्रांचा समावेश आहे. मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथून मंगळवार (दि.२५) रोजी मतपेट्या व साहित्यांचे वाटप करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

  • विभागात एकूण मतदार : ६९,३६८

  • पुरुष मतदार : ४६,५०३

  • महिला मतदार : २२,८६५

जिल्ह्यात २५ हजार ३०२ शिक्षक मतदार आहेत. मतदानासाठी जिल्ह्यात २९ केंद्रे आहेत. सर्वाधिक १० मतदान केंद्रे ही नाशिक शहरात आहेत. मालेगावला तीन केंद्रे आहेत. या व्यतिरिक्त येवला, सटाणा व निफाड येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे असतील. तसेच सुरगाणा, कळवण, देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व सिन्नर या ठिकाणी प्रत्येकी एक मतदान केंद्र आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शिक्षकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांनी केले आहे.

मतदानासाठी हे पुरावे ग्राह्य मानले जाणार आहेत

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदानाकरिता निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र हा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य मानली जाणार आहेत. त्यामध्ये आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / खासगी, औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.

नाशिक विभागातील मतदान व मतदान केंद्राची स्थिती याप्रमाणे आहे.

१ जुलै रोजी मतमोजणी

शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २६) मतदान पार पडणार आहे. दि. १ जुलै रोजी विभागाची एकत्रित मतमोजणी नाशिकच्या अंबड येथील वेअर हाउसमध्ये होणार आहे. त्यासाठी मतदान पार पडल्यानंतर त्या-त्या जिल्ह्यांमधील मतपेट्या एकत्रितरीत्या बंदोबस्तात येथे आणल्या जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT