नाशिक: विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकपा) वतीने नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावर उग्र 'चक्का जाम' आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामुळे नाशिककडून गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पेठ आणि परिसरातील आदिवासी तालुक्यांमधील शेकडो आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता आंदोलकांनी रात्रभर रस्त्यावरच ठाण मांडले होते. जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
आंदोलकांनी प्रशासनासमोर आपल्या विविध मागण्यांचे पत्र ठेवले आहे, ज्यात प्रामुख्याने प्रलंबित असलेले वनपट्टे धारकांचे दावे तात्काळ मंजूर करावेत. वनपट्ट्यांच्या जमिनींच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर त्वरित कराव्यात. रेंगाळलेली जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
प्रशासनाकडून अद्याप समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. "जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर यंदाचा प्रजासत्ताक दिन आम्ही रस्त्यावरच साजरा करू," असा निर्वाणीचा इशारा माकपा आणि किसान सभेच्या नेत्यांनी दिला आहे.
महामार्ग रोखल्यामुळे प्रवाशांचे आणि मालवाहतूक करणाऱ्या चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनेही वाहतूक कोंडीत अडकली आहेत. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने पेठ प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.