नाशिक : पाच महिन्यांपासून निर्माण झालेला नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आता सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने भाजपच्या झोळीत कुंभमेळा मंत्रिपद पडल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे.
भुजबळ अचानक ॲक्शन मोडवर आल्याने या चर्चेला बळकटी मिळाली आहे. दरम्यान, शनिवारी (दि. १५) नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री भुजबळ यांच्या भेटीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने भुजबळ फार्म पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरल्याचे दिसून आले.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत गेल्या पाच महिन्यांपासून ओढाताण सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी १९ जानेवारीला पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. परंतु, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले होते. शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिल्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्याला २४ तासांतच स्थगिती दिली होती. यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्रिपदासाठी दावा केला गेला. त्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसह अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नावाची चर्चा झाली. त्यात कोकाटे यांचा दावा प्रबळ असतानाच, शासकीय सदनिका घोटाळ्यात त्यांना शिक्षा झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला होता. त्यानंतर भुसे आणि महाजन यांच्यात पालकमंत्रिपदाची स्पर्धा सुरू असताना भुजबळांच्या रुपाने तिसऱ्या भिडूची एंट्री झाली. महाजनांकडे कुंभमेळामंत्रिपद दिले गेल्यानंतर राष्ट्रवादीकडून नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा शनिवारी (दि.14) रोजी दिवसभर होती. दरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे, धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी महापौर विनायक पांडे, अशोक मुर्तडक आदींसह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी मंत्री भुजबळ यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्मवर गर्दी केल्याचे चित्र होते.
नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने हजारो कोटींचा निधी येणार आहे. त्यामुळे या निधीवर भाजपला कंट्रोल हवा आहे. तर भुजबळ यांनी या आधीच्या कुंभमेळ्यावेळी पालकमंत्रिपद भूषवले होते. त्यामुळे मंत्रिपदाचा अनुभव आणि आधीच्या कुंभमेळा नियोजनातील सहभागावर भुजबळांकडून दावा केला गेला. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.