पुढारी ऑनलाइन डेस्क | अवघ्या 24 तासांच्या आत रायगड व नाशिकमध्ये जाहीर केलेलं पालकमंत्री पद स्थगित करण्याची नामुष्की महायुतीवर आल्याने महायुती सरकारमधील पालकमंत्री पदाचा वाद अखेर चव्हाट्यावर आला. नाशिकमध्ये गिरीश महाजन व रायगडमध्ये आदिती तटकरे यांचा पत्ता आता कट झाला आहे. रायगडचा विचार करता आता शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या तर नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गटाच्या) दादा भुसे व राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) माणिकराव कोकाटे या नावांची चर्चा आता पालकमंत्री पदासाठी होऊ लागली आहे.
महायुतीमध्ये खातेवाटप जाहीर झाल्यानंतरही पालकमंत्रीपदाचा निर्णय बराच काळ रखडला होता. अखरे दिड महिना उलटून गेल्यानंतर १८ जानेवारीला राजी रात्री उशिरा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. त्यातच अवघ्या 24 तासांत नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगित देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी व शिवसेना हे दोनही पक्ष इच्छुक आहेत. नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार तर राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे संख्या बळाचा विचार करता राष्ट्रवादीचा पालकमंत्री व्हावा अशी इच्छा राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची होती. तर दुसरीकडे जेष्ठत्वाचा विचार करता शिवसेनेचे दादा भुसे यांना पालकमंत्री केलं जावं अशी इच्छा शिवसैनिकांची होती. मात्र, दोघांनाही डावलून गिरीश महाजन यांचे नाव जाहीर होताच राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात असंतोष निर्माण झाला. त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने महाजन यांच्या नावाला स्थगिती दिल्याचा आदेश काढला.
गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती दिल्यानंतर आता पालकमंत्री पद कोकाटे की भुसे या दोघांपैकी कुणाकडे जाणार यासंदर्भात चर्चा रंगली आहे. गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती दिली असली तरी पद एक आणि उरले दोन अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी दिली जाते की, वाद टाळण्यासाठी तिसरा पर्याय शोधला जातो हे पाहावे लागणार आहे.
भाजपचे शहरात तीन आमदार असूनही भाजपचा मंत्री नाही म्हणून गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आलं. तसेच 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आहे. गिरीश महाजन यांच्याकडे मागील कुंभमेळ्याचे नियोजन करण्याचा असलेला अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, आता भाजपकडे मंत्रीपदही नाही व पालकमंत्रीपदही नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. याउलट राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांना वजनदार खात्यासह मंत्रिपद दिलं गेलं आहे. तर, शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्याकडेही शालेय शिक्षण मंत्री पद आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाची नाराजी दूर करुन पुन्हा गिरीश महाजन यांनाच संधी दिली जावू शकते असाही अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांनी पालकमंत्रीपदावरील दावा कायम असल्याची भूमिका घेतली आहे. आमचे सात आमदार असल्याने पालकमंत्रीपद आम्हालाच मिळावे अशी आमची मागणी कालही होती आणि आजही आहेच. मात्र, निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत ते तो घेतली. मात्र स्थानिक नेताच पालकमंत्री असावा, त्याला जिल्ह्याचा आवाका माहित असतो, प्रश्न माहित असतात. जिल्ह्यातच पालकत्व असल्याने लोकांना वेळ देता येतो व प्रश्न सोडवता येतात अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
दरम्यान काल, पालकमंत्रिपद डावलले अशातला काही भाग नाही असे दादा भुसे यांनी म्हटले होते. मात्र, कोकाटे यांनी पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवल्याचे पाहाता भुसे आपल्या भूमिकेवर कायम राहाता की तेही आपली वेगळी भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.