नाशिक

नाशिक : राष्ट्र विकसित करण्यासाठी समुह प्रयत्न आवश्यक – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

अंजली राऊत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
राष्ट्राला विकसित करावयाचे असेल तर समुह प्रयत्न आवश्यक आहे. विविध शैक्षणिक संस्थांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी सुरु केली आहे. शैक्षणिक संस्थांनी समुहाने आता एकत्र येत विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले आहे.

दि न्यू एज्युकेशन संस्थेच्या वतीने डॉ. अनिल काकोडकरांना अक्षय्य पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुयेशा काकोडकर, दिलीप वैशंपायन, दि न्यू एज्युकेशनचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सचिव हेमंत बरकले आदी उपस्थित होते. यावेळी दि न्यू एज्युकेशनचे उडाण आणि स्मरणगाथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या भाषणात डॉ. काकोडकर यांनी इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाला बघितले तर आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. अमेरिका, चीन, रशिया तंत्रज्ञानात खूप पुढे असले तरी त्यांनी त्यांचे काम थांबवलेले नाही. त्यांच्यामध्ये सातत्य असल्याने त्या देशांना जगातील पुढारलेले देश समजले जाते. पुढारलेले देश आणि आपण याची तुलना केल्यास हे अंतर वाढत चालले आहे. आपल्याला देशाला पुढे न्यायचे असेल तर आपल्या तंत्रज्ञानाची गती वाढविली पाहिजे. आपल्याही देशात सातत्याने संशोधन आणि विकास सातत्याने होत असतो. आपल्या राष्ट्राकडे एक मोठी पिढी शिकत आहे आणि म्हणूनच आपल्याला शैक्षणिक धोरणात सुधारणा करणे आ‌वश्यक होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी चौकटीऐवजी कौशल्याधारित शिक्षण घेईल आणि हेच कौशल्य विकसित होऊन देशाच्या विकासाला हातभार लागेल. बालशिक्षण, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यामध्ये आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे असणे आवश्यक आहे. फक्त एक-दोन मुलांनी असे करणे अपेक्षित नाही. सरासरी भारतीय मुलांसाठी अशा सुविधा आवश्यक असून त्यासाठी सामाजिक चळवळ तयार होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रकाश वैशंपायन यांनी डॉ. काकोडकर यांनी हा सन्मान स्विकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, आपली लोकसंख्या जास्त असूनही आपल्याकडे शास्त्रज्ञ कमी आहेत. आपल्या शहरात कोणी मंत्री येणार असेल तर वारेमाप प्रसिद्धी मिळते. शास्त्रज्ञांना तर नाममात्र प्रसिध्दी मिळते. देशातील क्रीम ब्रेन हा परदेशात जात आहे. त्याचा वापर बाकीचे देश करत असल्याची खंत व्यक्त केली. पोखरण अणू स्फोटामध्ये डॉ काकोडकरांनी केलेल्या अव्दितीय कार्यामुळे आपला देश अणूधारक झाला. त्यामुळे जगातील मोठ्या शक्ती देखिल आपल्याकडे आदरयुक्त भितीने बघायला लागल्या आहेत. आपल्या देशात शैक्षणिक संस्था शासनाच्या अधिपत्याखाली असून शिक्षकांची वाणवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढचे वीस वर्ष काकोडकरांनी दैदिप्यमान काम करावे. त्यामुळे अमेरिका, रशिया आणि चीन या देशांसोबत आपला देश उभा राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT