फळांची निर्यात बंदच  Pudhari News Network
नाशिक

Nashik Grape Farmers | कडक उन्हामुळे द्राक्षाला सफेद कापडाचे आच्छादन

Nashik Grape Farmers | जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकरी ६० ते ७० हजारांचा अतिरिक्त खर्च

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात सध्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा थेट परिणाम द्राक्ष बागांवर होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा तब्बल ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

या वाढत्या उष्णतेमुळे द्राक्षांच्या घडांची प्रतवारी खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षबागांवर सफेद कापडाचे अच्छादन केले आहे.

येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अभिषेक होळकर यांनी आपल्या शेतात हा प्रयोग केला आहे. होळकर यांची सुमारे २२ एकर शेती असून, त्यापैकी १२ एकरांवर द्राक्षबाग उभी करण्यात आली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे चार एकरांवरील द्राक्षबागेला फळधारणा झाली नाही.

मोठा खर्च करीत उर्वरित आठ एकर द्राक्षबागेपैकी चार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेवर सफेद कापड टाकून आच्छादन करण्यात आले आहे. सध्या वातावरणातील सतत होणारे बदल, वाढती उष्णता आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे द्राक्ष शेती अधिकच आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची मागणीही अभिषेक होळकर यांनी केली आहे.

गुणवत्ता, प्रतवारीसाठी धडपड

आच्छादनामुळे द्राक्षांवर पडणारा थेट सूर्यप्रकाश कमी होतो तसेच वाढत्या उष्णतेपासून घडांचे संरक्षण होते. परिणामी द्राक्षांची गुणवत्ता आणि प्रतवारी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. निर्यातक्षम दर्जाची द्राक्षे तयार करण्यासाठी हा उपाय काही शेतकरी अवलंबत आहेत. मात्र हा उपाय शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरत आहे. द्राक्षबागेवर सफेद कापडाचे अच्छादन करण्यासाठी प्रतिएकर सुमारे ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च येत आहे. आधीच खत, औषधे, मजुरी आणि पाण्याच्या व्यवस्थेमुळे उत्पादन खर्च वाढलेला असताना, आता या अतिरिक्त खर्चामुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT