लासलगाव : राकेश बोरा
जगभरात निर्यातक्षम द्राक्षांसाठी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड, रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली. नेदरलँड आणि जर्मनी या युरोपीय देशांत दोन कंटेनरमधून 30 मे. टन द्राक्षांची पहिली खेप रवाना झाल्याने द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक दर्जाच्या निकषांमुळे नाशिकच्या द्राक्षांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उपस्थिती अधोरेखित केली. द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे पीक असून, 2024-25 हंगामात दोन लाख 71 हजार 253 मे. टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून तीन हजार 50 कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले. यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी आव्हानात्मक ठरला आहे. सलग 6 महिने झालेल्या पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले.
जवळपास 50 टक्क्यांहून अधिक द्राक्षबागा बाधित झाल्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी निर्यातीचा मार्ग कायम ठेवला. यंदा राज्यातून 24 हजार 724 द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. कर्नाटकात नऊ द्राक्षबागांची नोंदणी करण्यात आली. वाढती मागणी लक्षात घेता केंद्राने निर्यातीसाठी लक्ष देण्याची मागणी शेतकरी व निर्यातदारांकडून होत आहे. विशेषतः वाहतूक खर्च, ड्यूटी सवलत तसेच नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेतल्यास भारतीय द्राक्ष निर्यातीला मोठा वाव मिळू शकतो.
गुणवत्तेत सुधारणा होत असली, तरी देशांतर्गत आणि निर्यात बाजारातील असुरक्षितता कायम आहे. सतत बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि मजूर टंचाईवर मात करत द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावत ठेवली आहे. गोड चव आणि दर्जाच्या बळावर नाशिकच्या द्राक्षांनी जागतिक बाजारात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
पर्यावरणीय बदलांमुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात असून, सिंचन सुविधा असूनही बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी शाश्वत उपाययोजना उपलब्ध नाहीत. उत्पादन वाढले, तरी बाजारभाव कोसळण्याची भीती, शासनाच्या आयात - निर्यात धोरणांचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. अशा अनेक अडचणींवर मात करत नाशिकमधील जिद्दी शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.