लासलगाव : राकेश बोरा
एकीकडे आकाशातून अवकाळीचा मार आणि दुसरीकडे मध्य पूर्वेत भडकलेल्या युद्ध परिस्थितीची झळ या दुहेरी संकटात नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांचा कणा यंदा अक्षरशः मोडला आहे. निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या द्राक्ष पट्ट्यात यंदा तब्बल ३५ टक्क्यांची घट झाली असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
यंदाच्या हंगामात ३ हजार ८७० कंटेनरमधून ५४ हजार ८२५ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली असली, तरी हा आकडा अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. इराण-इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित वाढत्या तणावामुळे मध्य पूर्वेतील बाजारपेठा अस्थिर झाल्या, परिणामी निर्यात मंदावली. मागील वर्षी ६ हजार १६५ कंटेनरमधून ८३ हजार १४६ मे. टन द्राक्षांची निर्यात झाली होती.
द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे महत्त्वाचे फळ आहे. सन २०२४-२५ या हंगामात देशातून २ लाख ७१ हजार २५३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली असून, त्यातून सुमारे ३ हजार ५० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले होते. मात्र यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे.
सलग सहा महिने झालेल्या पावसामुळे जवळपास ५० टक्क्यांहून अधिक द्राक्षबागा बाधित झाल्या आहेत. उत्पादन घटल्याने द्राक्ष बागायतदार आर्थिक अडचणीत आले आहे. द्राक्षबागेसाठी केलेला खर्च, औषध फवारणी, मजुरी वाढली आहे.
पण उत्पन्न मात्र घटले. निर्यात बंद पडल्याने मालाला योग्य दरच मिळत नाही, अशी हताश प्रतिक्रिया सुनील गवळी या शेतकऱ्याने व्यक्त केली. निर्यातदारांच्या मते, वाढलेले वाहतूक खर्च, विमा दर आणि आंतरराष्ट्रीय अनिश्चितता यामुळे व्यवहार करणे कठीण झाले आहे.