नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत सिद्धपिंप्री (ता. नाशिक), मोडाळे (ता. इगतपुरी) व अंदरसूल (ता. येवला) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामविकास व पंचायत राज सक्षमीकरणातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सन्मानित सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी
सिद्धपिंप्री : सरपंच भाऊसाहेब ढिकले व ग्रा.पं. अधिकारी दौलत गांगुर्डे
मोडाळे : सरपंच शिल्पा आहेर व ग्रा.पं. अधिकारी हनुमान दराडे
अंंदरसूल : उपसरपंच रवींद्र वाकचौरे व ग्रा.पं. अधिकारी बाळासाहेब बोराडे
केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशांनुसार दरवर्षी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो. यावर्षी 'पंचायत, सशक्त लोकशाहीचा पाया' ही संकल्पना अधोरेखित करत, जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेमध्ये पंचायत राज दिनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त बिहार येथून प्रसारित होणारे विशेष संदेशाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून नाशिक जिल्ह्यातील सिद्धपिंप्री ग्रामपंचायतीची निवड झाली होती. मोडाळे ग्रामपंचायतीने 'माझी वसुंधरा' उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली असून, अंदरसूल ग्रामपंचायतीने ई- गव्हर्नन्स प्रकारात चांगले काम केले असल्याने या तिन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, प्रशांत पवार, मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात या निमित्त विविध विकासकामांचे उद्घाटन, लाभार्थ्यांना योजना संबंधित मदतीचे वितरण, जलसंवर्धन, स्वच्छता अभियान, महिलांचे सशक्तीकरण, डिजिटल ग्रामपंचायत यांसारखे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांशी थेट संवाद साधून शासनाच्या योजनांची माहिती देण्यावर भर दिला गेला.