देवळाली कॅम्प (नाशिक) : गोरेवाडी येथे प्रस्तावित रेल्वे अंडरब्रिज प्रकल्पासाठीची आराखडा योजना रेल्वे प्रशासनाने २०२१ मध्ये मंजूर करून, तो केवळ जागेअभावी रखडला असताना आमदार सरोज आहिरे यांनी राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठपुरावा करत मध्यवर्ती कारागृहाची जागा मिळविल्यामुळे या अंडरब्रिज उभारणीला गती मिळाली आहे.
रेल्वे अंडरब्रिज प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एनओसीही मिळाली आहे. मात्र नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासन आणि एडीआयजी पोलिस यांच्याकडून २,७१७ चौ.मी. जमीन (डीपी प्लॅननुसार १८ मीटर रस्ता आरक्षणामध्ये येणारी) हस्तांतरित करण्यासाठीची परवानगी प्रलंबित असल्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला होता. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार आहिरे यांनी गृह विभागाच्या सचिव राधिका रस्तोगी यांच्यासमवेत मध्यवर्ती कारागृह परिसर आणि गोरेवाडी गेट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान रस्तोगी यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी मागील वर्षभरापासून आहिरे यांनी एमआरआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल यांच्या सहकार्याने गृह विभाग तसेच प्रधान सचिव (सुरक्षा व अपील) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे जेल रोड ते गोरेवाडी रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने हा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे. शासनाने कारागृहाचा भूखंड हस्तांतरित करण्यासाठी 'ना हरकत' प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार मध्यवर्ती कारागृहाची २,७१७ चौ.मी. जागा नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आरयूबी प्रत्यक्ष बांधकामाला मार्ग मोकळा झाला आहे.
“गोरेवाडी रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे अंडरब्रिज कुंभमेळ्यापूर्वी खुला करणे प्राधान्याची बाब आहे. या प्रकल्पामुळे गोरेवाडी येथील रहिवाशांना वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही, असा मला विश्वास आहे.”सरोज आहिरे, आमदार, देवळाली.
आरयूबी प्रकल्प हा नाशिक शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, २०२७ च्या कुंभमेळ्यातील संभाव्य वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होईल. रेल्वे गेटवरील गर्दी कमी होऊन पादचारी आणि वाहनचालकांसाठी सुरक्षित, सुलभ व निर्बंधमुक्त मार्ग उपलब्ध होणार आहे.