सुरगाणा : देशी - विदेशी दारूचा मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनावर सुरगाणा पोलिसांनी आज (दि.७) दुपारी दीडच्या दरम्यान कारवाई केली. सुरगाणा-बोरगाव रस्त्यावरील नूतन काॅलेज समोर कारवाई करत पोलिसांनी वाहनासह मद्यसाठा असा ४ लाख १८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यात पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान सुरगाणा-बोरगाव रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना एक चारचाकी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात १८ हजार ४२० रुपयांची देशी- विदेशी दारू आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत १८ हजार ४२० रुपयांची देशी- विदेशी दारू व चारचाकी वाहन असा ४ लाख १८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गंगा बोवाजी बागुल (४०, रा. कोठुळा, ता. सुरगाणा) याच्या विरोधात सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात असून याबाबत पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराम गायकवाड, रमेश चव्हाण, एस. एस. गावित तपास करत आहेत.