Nashik Election News Pudhari News Network
नाशिक

Nashik news | गोदावरीसह उपनद्यांच्या स्वच्छतेचेही खासगीकरण

नाशिक महानगरपालिका ८० कंत्राटी सफाई कर्मचारी नेमणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गोदावरी नदीसह शहरातील उपनद्यांच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वच्छता आणि देखभालीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गोदावरी तसेच वालदेवी, वाघाडी, कपिला आणि नंदिनी या उपनद्यांच्या काठावरील २०० फूट परिसराची साफसफाई, गाळ काढणे आणि नियमित देखभालीसाठी ८० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासंदर्भातील २.६५ कोटींचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

गोदावरी नदीला नाशिककरांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गोदावरी नदीकाठी दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा गोदावरीच्या महात्म्यात भर घालणारा आहे. मात्र, सध्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि गाळ साचल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या वाढली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने नदी आणि उपनद्यांची स्वच्छता राखण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने हा प्रस्ताव पुढे आणला आहे.

या योजनेंतर्गत २७३ दिवसांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नदी स्वच्छ ठेवणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोदावरी व उपनद्यांच्या दोन्ही काठांवरील २०० फूट परिसराची नियमित साफसफाई, कचरा, प्लास्टिक आणि साचलेला गाळ काढणे, नदी परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे तसेच काम पूर्ण झाल्यानंतर सातत्याने देखभाल करणे ही कामे केली जाणार आहेत.

नदीनिहाय कर्मचारी नियुक्ती

  • गोदावरी: ३५

  • नंदिनी: २५

  • वाघाडी: ०८

  • वालदेवी: ०६

  • कपिला: ०६

  • इतर उपनद्या: २०

  • एकूण: ८० कर्मचारी

नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष

महापालिकेकडे आधीच सुमारे ८०० कंत्राटी सफाई कर्मचारी कार्यरत असून, नदी परिसरात नियमित स्वच्छता केली जाते. तसेच गोदावरी स्वच्छतेसाठी स्वतंत्र गोदावरी संवर्धन कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे. तरीही नव्याने ८० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने नगरसेवकांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळते का, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT