नाशिक :नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीची जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सव व आगामी कुंभमेळा पर्यावरणपूरक व निर्विघ्न पार पडावा, असे साकडे जिल्हाधिकारी शर्मा यांनी घातले. तर आयुक्त खत्री यांनी आगामी कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प यावेळी सोडला.
मेनरोड येथील नाशिक पूर्व विभागीय कार्यालयात शहरातील मानाच्या गणपतीची जिल्हाधिकारी शर्मा आणि आयुक्त खत्री या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा झाली. पंढरपूर येथील नामदेव पायरीचा पर्यावरणपूरक देखावा नाशिक महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकार केला आहे. शर्मा - खत्री दाम्पत्याने या देखाव्याचे कौतुक केले. त्यानंतर राजीव गांधी मुख्यालयातील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ रामकुमार सौरीस सहाय, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता संजय अग्रवाल, उपाआयुक्त लक्ष्मीकांत सातारकर, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी उपस्थित होते. भक्तिभाव, उत्साह आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात आले.