नाशिक : नाशिकच्या संस्कृतीचा गौरव करणारा हा 'गोदावरी गौरव' आहे. काहीतरी चांगल घडतयं आणि त्यामागे तात्यारावांची दिव्यदृष्टी आहे. चांगली गुणवत्ता असलेली माणसं त्याची सर्जनशीलता ओळखणं हे महत्वाचं काम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे होत आहे, अजूनही माणसं चांगली काम करत असून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या नावाने ते ओळखलं जात असल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी सांगितले. नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा 'गोदावरी गौरव पुरस्कार' प्रदान करतांना अशा शब्दसुमनांनी त्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
यामध्ये 'वृक्षवीर' म्हणून सयाजी शिंदे, 'विक्रमवीर' म्हणून प्रशांत दामले तर 'सर्जनशील कलावंत' असलेले चंद्रमोहन कुलकर्णी यांची अनोखी शैलीचा येथे सन्मान झाल्याचे वसंत आबाजी डहाके यांनी सांगितले. मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रतिष्ठीत असा 'गोदावरी गौरव पुरस्कार' मंगळवारी (दि.१०) प्रदान करण्यात आला. प्रत्येक पुरस्कारार्थीस २१,००० रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्काराचे हे १८ वे वर्षे होते. यामध्ये भारतातील जागतिक कीर्तीचे रसायन अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित, (विज्ञान), महाराष्ट्रातील साहसी युवकांसाठी प्रेरणास्थान ठरलेले आशिष माने (साहस), चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), पडद्यावर कडक, रौद्र भूमिका साकारणारे, प्रत्यक्ष आयुष्यात मात्र पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते अभिनेते सयाजी शिंदे (लोकसेवा), नाट्य अभिनेते प्रशांत दामले (नाट्य) आणि उस्ताद उस्मान खान (संगीत) यांना यंदाचा 'गोदावरी गौरव पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देतांना आशिष माने म्हणाले, बालपणापासून कुसुमाग्रज यांच्या कविता खूप आवडायच्या. त्यामुळे 'अमर्याद मित्रा तुझी थोरवी...' 'अनंत आमची ध्येयाशक्ती...' या कवितेपासून प्रेरणा घेत पहिली मोहीम हाती घेत मायनय ४० डिग्रीच्या तापमानात हिमालय सर केला. तर डॉ. अनिरुद्ध पंडीत यांनी सन्मानाची दिलेली रक्कम पुन्हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानलाच परत देणगी स्वरुपात बहाल केली.
चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सांगितले की, आजची शिक्षणव्यवस्था कोसळली असून कलाशिक्षण हे तंत्रशिक्षणामध्ये रुपांतरीत होऊ पाहत आहे. आजच्या चित्रकलेकडे उदासिनतेने बघितले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चित्रकला ही संवेदना असून त्यात आजची शिक्षणसंस्थेला त्यांनी दोषी ठरवले. तसेच उस्मानखान यांनी सांगितले की, वयाच्या चौथ्या वयापासून सतारवादन करत असून सतार ही मला प्रत्येक कार्यक्रमात घेऊन जात असते. त्यामुळे एकदा तरी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये सतारवादनाने संगीतसेवा करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
निसर्गासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे सयाजी शिंदे यांनी सांगितले की, आईनंतर महत्वाचे असे झाडं आपण जगवली पाहिजे. शिरवाडकरांच्या भूमीत शिरवाडे येथे दत्ता यांच्या सहकार्याने साडेसहा हजार झाडे लावली असून आता दहा हजार झाडे लावणार असल्याचा मानस त्यांनी सांगितला. तसेच प्रशांत दामले यांनी सांगितले की, महाविद्यालयापासून अभिनयाची आवड निर्माण झाली आणि ती टिकवली. रंगदेवतेच्या कृपेने प. सा. सायखेडकर, कालिदास आणि त्यानंतर एक नाट्यगृह उभारण्याची संकल्पना त्यांनी नवनिर्वाचित महापौरांसमोर मांडली. त्याला महापौरांनी देखील संमती दिल्याचे मान डोलावून होकार दिला.
कार्यक्रमास कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विलास लोणारी, मकरंद हिंगणे, लोकेश शेवरे, संजय पाटील, उपाध्यक्ष प्रकाश होळकर यांसह मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चंद्रकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सहकार्यवाह ॲड. राजेंद्र डोखळे यांनी प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. दिलीव धोंडगे यांनी आभार मानले.