नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि सोनोग्राफी केंद्रांच्या नियमित तपासणीमुळे नाशिक शहरात मुलींच्या जन्मदरात लक्षणीय सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. सन २०२४-२५ मध्ये दर हजार मुलांमागे ८८४ पर्यंत घसरलेला मुलींचा जन्मदर २०२५-२६ या कालावधीत वाढून ९०९ पर्यंत पोहोचला आहे. महात्मानगर परिसरातील एका रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली होती. मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या औषधांचा साठा आढळून आल्याने स्त्री भ्रूणहत्येबाबतचा संशय अधिक बळावला होता. त्यानंतर महापालिकेने सोनोग्राफी केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागाने गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी केली जात आहे. स्त्री भ्रूणहत्येविरोधात व्यापक जनजागृती मोहिमाही राबवण्यात आल्या. समाजातील वंशाला मुलगाच हवा या जुनाट मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले. त्याचा परिणाम म्हणून मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वर्षभरात सकारात्मक बदल
सन २०२३-२४ मध्ये हा दर ८८७ होता. त्यानंतर २०२४-२५ मध्ये तो घसरून ८८४ झाला. मात्र, २०२५-२६ मध्ये परिस्थितीत सुधारणा होत जन्मदर पुन्हा ९०९ पर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. महिनानिहाय आकडेवारीतही वाढता कल दिसून येतो. एप्रिल २०२५ मध्ये ९३६, सप्टेंबरमध्ये ९२३, नोव्हेंबरमध्ये ९५६, जानेवारी २०२६ मध्ये ९२७, फेब्रुवारीमध्ये ९८६ आणि मार्चमध्ये ९८२ असा उच्चांक नोंदवला गेला आहे. या आकडेवारीवरून वर्षभरात सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येते.
मुलींचा जन्मदर वाढावा
यासाठी वर्षभर विविध जनजागृती मोहिमा राबवण्यात येतात. तसेच सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी केली जात आहे. त्यामुळे जन्मदरात वाढ झाली आहे. डॉ जितेंद्र धनेश्वर, सहायक आरोग्य अधिकारी