नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३१) नाशिकमधील रामकुंड येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. दुपारी १२.०२ वाजता ध्वजारोहण, सायंकाळी गोदावरी तीरावर भव्य महागोदा आरती होणार आहे.
या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्यानिमित्त गोदाघाट परिसर, मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूना आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात येत आहे. या कंपनीच्या आवश्यक तांत्रिक व्यवस्था आणि इव्हेंट इफ्रास्ट्रक्चरची कामे करण्यात येत आहेत.
गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर पूल आकर्षक रोषणाईने उज्जळून निघणार आहे. गोदातीर परिसराला विशेष प्रकाशसौंदर्य प्राप्त होणार आहे. घाट परिसरातील मंदिरे, धार्मिक स्थळे आणि गोदाकाठावरील वास्तूंचे सौंदर्य उठावदार पद्धतीने अधोरेखित करण्याचे नियोजन आहे.
आधुनिक प्रकाशयोजनेच्या माध्यमातून नाशिकचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा अधिक आकर्षक स्वरूपात समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ध्वजारोहण आणि महाआरतीसाठी देशभारतून भाविक, साधू - महंत आणि मान्यवर नाशिकमध्ये येण्याची अपेक्षा आहे.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रकाशयोजना आणि तांत्रिक व्यवस्था विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान, या कामाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नागरिकांना रोजगारनिर्मिती झाली आहे. या कामासाठी १२०० स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
नाशिकच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच स्थानिक उद्योग आणि रोजगाराला चालना देणारा हा उपक्रम ठरण्याची अपेक्षा असून, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक व्यवस्था, विद्युत रोषणाई, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची क्षमता नाशिकमध्येच उपलब्ध असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे.
स्थानिक कंपनीच्या नेतृत्वाखाली विविध स्थानिक विक्रेते, तंत्रज्ञ आणि कामगार एकत्रित काम करीत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभ हा सोहळा नाशिकच्या धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वपूर्ण क्षण होणार आहे. गोदातीरावरील भव्य आरती, ऐतिहासिक वास्तूवरील रोषणाई आणि स्थानिक मनुष्यबळाचा सहभागामुळे हा सोहळा विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
इलेक्ट्रीशियन, लायटिंग तंत्रज्ञ, फिटर, ऑपरेटर, सहायक कर्मचारी आणि विविध तांत्रिक कामांत स्थानिकांना मनुष्यबळाला संधी मिळत आहे.
विशेष म्हणजे, नाशिकमधील एलईडी लायटिंग, एलईडी स्क्रीन आणि इव्हेंट प्रॉडक्शन क्षेत्रातील अनेक स्थानिक विक्रेते व व्यावसायिक या कामात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या माध्यमातून स्थानिक व्यवसायिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळत आहेत.
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीपात्रात गुरुवारी (दि. २९) मध्यरात्रीपासून गोदावरीत एकलहऱ्याच्या आवर्तनातून ३०० ते ३५० क्यूसेकने आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जलसंपदाममंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या आवर्तनाचा उपयोग ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी केला जाणार आहे.
गोदाकाठाच्या १० ते १२ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आणि काही शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणी मागितले होते. मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनामुळे रामकुंड परिसरात ध्वजारोहण आणि महाआरतीच्या वेळेस पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिंहस्थ काळात गोदावरीत पुरेसा पाणीसाठा कायम राहावा, यासाठी रामकुंड परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मागणी पुरोहित संघाने केली आहे.
एकलहुरे औद्योगिक विद्युत प्रकल्पासह नांदूरमध्येश्वर पक्षी अभ्यारणासाठी वनविभागाने पाण्याची मागणी केली आहे. यासाठी ६३५ एमएमसीफटी पाण्याचे स्वतंत्र आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.