जुने नाशिक : अबरार पिरजादा
शहरातील वाढती गुन्हेगारी आता सार्वजनिक उद्यानांपर्यंत पोहोचली असून, अनेक उद्याने मद्यपी व व्यसनाधीनांच्या अड्ड्यांमध्ये रूपांतरित होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
विशेषतः जुन्या नाशिक परिसरातील कथडा आणि सह्याद्री रुग्णालयाच्या परिसरातील उद्याने याचे ठळक उदाहरण ठरत आहेत. या उद्यानांमध्ये दिवसाढवळ्या सर्रासपणे मद्यपान करणाऱ्या टवाळखोरांची वर्दळ वाढली आहे. परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच साचलेला दिसून येतो. ही परिस्थिती पाहता, 'महापालिकेने ही उद्याने मुलांसाठी तयार केली की मद्यपींसाठी?' असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरात साडेपाचशेहून अधिक लहान-मोठी उद्याने आहेत. लोकानुनयासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिका तसेच शासन निधीतून उद्याननिर्मितीचा धडाका लावला. मात्र, या उद्यानांच्या देखभालीची यंत्रणा महापालिकेकडे नसल्यामुळे उद्यानांवर अवकळा आली आहे. त्याचा गैरफायदा टवाळखोर, व्यसनी मंडळींकडून घेतला जात आहे. जुने नाशिकमधील कथडा रुग्णालयालगत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नागजी चौकातील कानडे उद्यान त्याचे ज्वलंत उदाहरण बनले आहे. या उद्यानांच्या देखरेखीसाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे तेथे दिवसाढवळ्या मद्यपान करण्याचे प्रकार वाढले आहेत. उद्यानात मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. प्रेमीयुगुलांचाही सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी या उद्यानांचा वापर अनैतिक कारणांसाठी होत असल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिकांना टवाळखोरांकडून उपद्रव होत आहे. उद्यानांमधील खेळण्यांचीही टवाळखोरांकडून मोडतोड केली जात असल्यामुळे महापालिकेचेही नुकसान होत आहे. त्यामुळे या उद्यानांसाठी सुरक्षारक्षक नेमण्याची तसेच उद्यान परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
उद्यानांमध्ये मद्यपी, टवाळखोरांचा वावर
टवाळखोरांकडून उद्यानांमधील खेळण्यांची मोडतोड
उद्यानांमध्ये गाजरगवत वाढले, मनपाचे दुर्लक्ष
उद्यानात मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच
जागोजागी कचऱ्याचेही साचले ढीग
नागजी परिसरातील उद्यानात गावगुंडांनी बस्तान बसविले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही महिलांना दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या भागात पोलिसांनी दिवसा व रात्रीच्या वेळेस गस्त घालण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.