Nashik Water Supply Gangapur Dam 
नाशिक

Gangapur Dam | गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी मिळेना ठेकेदार; महापालिकेसमोर मोठा तिढा निर्माण

Gangapur Dam | दोन वेळा प्रतिसाद नाही; तिसऱ्यांदा फेरनिविदा काढण्याची मनपावर वेळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असले, तरी भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. धरणातील मृतसाठ्यातील पाणी उचलण्यासाठी चर खोदण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, या कामासाठी दोन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. मात्र, जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. ऑगस्टमध्येही पावसाची संततधार कायम राहिल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्गही करण्यात आला. त्यामुळे नाशिकसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे.

धरणात मुबलक पाणीसाठा असावा, तरी भविष्यात पावसाने दडी मारल्यास निर्माण होणारी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन महापालिकेने मृतसाठ्यातील पाणी वापरण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी धरणात चर खोदून पाणी उचलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गंगापूर धरण मातीचे असल्याने या कामासाठी स्फोटांचा वापर करता येणार नाही.

त्यामुळे विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खडक फोडून चर तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार कंपनीने ११ कोटी ६५ लाख रुपयांचा आराखडा तयार करून आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली.

मात्र, पहिल्याच निविदेला एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा निविदा काढताना धरणातील तसेच भुयारी मार्गातील कामांचा अनुभव असण्याची अट शिथिल करण्यात आली. तरीही ठेकेदारांनी निविदेकडे पाठ फिरवली. सलग दोन वेळा निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने आता महापालिककडून तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT