नाशिक : यंदा शहरातील विविध ३१ सार्वजनिक गणेश मंडळांकडून लाडक्या गणरायाला सुमारे ६८० किलो सोन्या - चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. या मौल्यवान मंडळांना पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. सर्वाधिक मौल्यवान गणराय भद्रकाली परिसरात असून त्याठिकाणी एक अंमलदार आणि दोन होमगार्ड गणरायाच्या सुरक्षेत तैनात आहेत.
रविवार कारंजा मित्रमंडळ : १५१ किलो चांदीचा गणपती
अशोकस्तंभ मित्रमंडळ : २१ किलो चांदीची मूर्ती
सरदार चौक मित्रमंडळ : ३५ किलो चांदी
बालाजी फाउंडेशन : पाच ग्रॅम सोने, ३० किलो चांदीची मूर्ती
पगडबंद लेन मित्रमंडळ : ११ ग्रॅम सोने, ५१ किलो चांदीचा गणपती
नवक्रांती मित्रमंडळ : सिंहासन (४७ किलो), चांदीची मूर्ती (३४ किलो)
वंदे मातरम संघटना : सोन्याची मूर्ती (साडेआठ तोळे)
यंदा शहर, परिसर व उपनगर मिळून सुमारे ७३० छोट्या-मोठ्या मंडळांना पोलिस आयुक्तालयाने परवानगी दिली आहे. सोन्या - चांदीच्या आभूषणांनी बाप्पाला मढविणारे रविवार कारंजा मित्रमंडळ, नवक्रांती मित्रमंडळ, अशोकस्तंभ मित्रमंडळ, सरदार चौक मित्रमंडळ, बालाजी फाउंडेशन मित्रमंडळ ही मंडळे श्रीमंत ठरली आहेत. अशा ३१ मौल्यवान गणेश मंडळांना पोलिस विभागाने विशेष सुरक्षा पुरविली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे निगणारी, तीन शिफ्टमध्ये स्वयंसेवकांची नेमणूक यासह इतर महत्वाच्या सुचना या मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना पोलिस विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शनिवारी उत्साहाच्या वातावरणात बाप्पाची स्थापना झाल्यानंतर पुढील १० दिवस नाशिककर गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी बाहेर पडतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी चोर्या, घरफोड्या वा इतर अप्रिय घटना घडू नये यासाठी नाशिक पोलिस अलर्ट मोडवर काम करीत आहेत. निर्भया मोबाइल, डायल ११२, दामिनी पथकांद्वारेही महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गणेश मंंडळांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकारी, एसआरपीएफ, होमगार्ड, अकार्यकारी आस्थापना, शीघ्र कृती दल असा सुमारे साडेतीन हजारांचा ताफा तैनात केला आहे. मंडळांनीही गणरायाच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडावी. कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही अप्रिया घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.- संदीप मिटके, सहायक आयुक्त, शहर गुन्हे शाखा