LPG Cylinder Price file photo
नाशिक

Nashik LPG Price Hike | इंधन दरवाढीचा स्वयंपाकघरात भडका

Nashik Petrol Diesel Price Hike | साखळी बिघडली : भाजीपाल्यापासून, किराणा साहित्यांचे दर गगनाला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील दहा दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याने, सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडू लागले आहे. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, फळे, दूध, किराणा, खाद्यतेल, गॅस ही संपूर्ण साखळीच प्रभावित झाली आहे. मासिक किराण्यामध्ये जवळपास दीड ते दोन हजारांची वाढ झाल्याने, महागाईचा स्वयंपाकघरात भडका उडाला आहे.

पुढील काही दिवसांमध्ये इंधनात पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता असल्याने, सर्वसामान्य महागाईच्या आगीत भरडले जाणार आहेत. गेल्या १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९, २३ आणि २५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यात आले.

नाशिकमध्ये सध्या पेट्रोल ११२ रुपये ४७ पैसे प्रति लिटर दर आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ९९ रुपये ११ पैशांवर पोहोचले आहेत. इंधन दरवाढीमुळे आयात खर्च, ट्रान्स्पोर्ट आणि गोदाम खर्च वाढल्याने, त्याचा परिणाम सर्वच वस्तूंच्या दरवाढीवर होत आहे.

विशेषतः भाजीपाला आणि किराणा साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ मागील १० दिवसांतच झाल्याने, सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. दूध वितरणासाठी लागणारा खर्च वाढल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात जवळपास हजार रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायही अडचणीत आला आहे.

अनेक ठिकाणी जेवणाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीचा सिलसिला पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मागील दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे ५ रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. अन्य शहरांत ही वाढ सात रुपयांपर्यंत आहे.

डिझेल दरवाढीमुळे दळणवळण प्रभावित

डिझेल महागल्याने देशातील दळणवळणावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला, फळे, दूध, डेअरी उत्पादन, औषधे, एफएमसीजी वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याशिवाय वाहतूक महागल्याने उत्पादन साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, ई-कॉर्मस डिलिव्हरी महाग झाली आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत असल्याने, सर्वसामान्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे.

इंधन दरवाढीमुळे ट्रान्स्पोर्ट व्यवसायावर देखील मोठे संकट आले आहे. अगोदरच हा व्यवसाय प्रचंड अडचणीत आहे. अशात डिझेल दरवाढ परवडणारी नाही. दरवाढीचा परिणाम सर्वच वस्तू महागण्यावर होणार आहे. भाजीपाल्यापासून ते किराणा साहित्य व अन्य वस्तूंच्या दरात भडका होईल.
- सचिन जाधव, अध्यक्ष, मोटार मालक कामगार वाहतूक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT