CBI असल्याची बतावणी करत तिघांना दीड कोटीचा गंडा Pudhari File Photo
नाशिक

Nashik Fraud News | CBI असल्याची बतावणी करत तिघांना दीड कोटीचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक | 'आम्ही सीबीआयमधून बोलत आहोत. तुमच्यावर गंभीर आरोप असून, त्यातून सुटका पाहिजे असल्यास पैसे द्या' असे सांगत भामट्यांनी शहरातील तिघांना सुमारे दीड कोटी रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत इंटरनेट, फोनवरून भामट्यांनी संपर्क साधला. तुमचा आणि तुमच्या पत्नीचा मोबाइल मनी लाँडरिंगमध्ये आढळला असून, तुमची सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही सांगतो त्या बँक खात्यामध्ये तुमच्याजवळील पैसे जमा करा, अशी भीती घातली. त्यासाठी भामट्यांनी स्काइप ॲपवरून नागरिकास व्हिडिओ कॉल करून पोलिस असल्याचे भासवले. त्यामुळे भीतीपोटी नागरिकाने एक कोटी ३० लाख रुपये भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यात टाकले.

त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीस भामट्याने फोन करून तुमचे बेकायदेशीर पार्सल येत असून, मुंबई पोलिस बोलत असल्याचे भासवून पाच लाख १९ हजार रुपये घेतले. तर एका महिलेस सायबर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगत तुमचे आधारकार्ड बेकायदेशीर कामासाठी वापरल्याने गुन्हा झाल्याची भीती घातली. तसेच यातून सुटण्यासाठी महिलेस सहा लाख ९० हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. अशा पद्धतीने भामट्यांनी शहरातील तिघांची एक कोटी ४२ लाख नऊ हजार ७९ रुपयांची फसवणूक केली. सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT