नाशिक : कर्कराेग बरा करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे देण्याच्या बहाण्याने कर्करोग पीडितेच्या पत्नीकडून १० लाख रुपये घेऊन संशयित फरार झाल्याची घटना २०१९ मध्ये घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तपास करीत मुंबईतून संशयितास पकडले आहे.
पारिजात नगर येथील पद्मा पवार यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना चार ते पाच संशयितांनी मिळून डिसेंबर २०१९मध्ये फसवणूक केली होती. पवार यांच्या पतीस कर्करोग असल्याने त्यांच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. पवार हे रुग्णालयात असताना संशयित आरोपी त्यांना भेटला. आमच्या वडिलांना देखील कर्करोग झाला होता. त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार केल्याने ते आठ दिवसांत बरे झाले असे सांगत संशयिताने पवार यांना आयुर्वेदिक उपचारासाठी प्रवृत्त केले.
वारंवार संपर्क साधून संशयिताने पवार यांना उपचार करण्यास सांगितले. त्यानंतर तुम्हाला घरीच औषधे बनवून देतो असे सांगून संशयिताने पवार यांच्या घरी गेला. त्यानंतर शरणपूर रोडवरील एका आयुर्वेदिक दुकानात नेत औषधांसाठी लागणारे साहित्य खरेदी केले. दुसऱ्या दिवशी संशयिताने पवार यांना फाेन करून दहा लाख रुपयांची मागणी करीत पैसे न दिल्यास औषध खराब होईल असे सांगितले. त्यामुळे पवार यांनी बँकेतून पैसे काढून संशयितास दिले. त्यानंतर संशयित पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी उपनगर पोलिस ठाण्यात संशयिंताविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील एक संशयित मुंबईत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रविण चौधरी पथकासह मुंबईला गेले. तेथे संशयित सुनील चिंचा वरगंटे (३९, रा. माचिस फॅक्टरी जवळ,कुर्ला वेस्ट मुंबई) यास पकडले.