लासलगाव : स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि.च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संशयित काळेंनी यावेळी फसवणुकीसाठी वापरलेला नवीन फंडा चांगलाच फाॅर्मात राहिला आहे. त्याने दामदुप्पटबरोबरच सोने ठेवा, सोनं दुप्पट अशी भन्नाट युक्ती वापरून २० किलोहून अधिकचे सोनं हडप केल्याची माहिती गुंतवणूकदारांकडून समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप वेगळी तक्रार दाखल झालेली नाही.
दामदुप्पटच्या नावाखाली महाराष्ट्रासह इतर राज्यांतील गुंतवणूकदारांना सुमारे 200 कोटींहून अधिकचा गंडा घालणाऱ्या संशयित सतीश काळे याचे नवीनवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत. लॉकरमध्ये सोने ठेवून फायदा नाही. त्यापेक्षा आमच्या कंपनीत सोनं ठेवा आणि ठरविक कालावधीत तेवढ्याच वजनाचे सोने मोफत मिळवा, अशी आकर्षक योजना त्याने काढून कोट्यवधी रुपयांचे सोने जमा केल्याचे पुढे येत आहे. त्यासाठी संशयित काळे कंपनी कोणाचे पैसे बुडवणार नाही, सगळ्यांची दिवाळी गोड होणार, अशी बतावणी करायचा, अशी माहिती गुंवतणूकदारांनी दिली आहे.
संशयित काळे यास अशाच एका घोटाळ्यात सात वर्षे शिक्षा झाली आहे. त्यानंतरही त्याने कारागृहातून बाहेर येऊन थाटामाटात स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. या नावाने नवीन कंपनी स्थापून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला. विशेष म्हणजे एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी, अशी घटना घडत असताना गुंतवणूकदारांनी करोडो रुपये गुंतवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लासलगाव आर्थिक फसवणूकप्रश्नी मंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची मालमत्ता गोठविणे, संशयित काळे याने ट्रान्स्फर केलेले पैसे कसे आणता येतील, पीडितांना पैसे कसे परत मिळतील, याबाबत त्यांनी सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. के. जगताप यांनी हा विषय मंत्री भुजबळ यांच्याकडे मांडला होता.
दामदुपटी योजनाला बळी पडलेल्यांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात, दिल्ली, कोलकाता या बड्या शहरांतील गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे या महाशयाचे नेटवर्क राज्याच्या बाहेर पसरलेले असून, समोर आलेला आकडा हिमनगाचे टोक असल्याची चर्चा रंगत आहे.