नाशिक : मेटल व्यावसायिकास भामट्यांनी बनावट अॅप व लिंकच्या माध्यमातून नामांकित कंपनीच्या नावे गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकास एक कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घातला. या फसवणुकीच्या रक्कमेतील पाच लाख रुपये नाशिकमधीलच एका संशयिताच्या बँक खात्यात जमा झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
एक मेटल व्यावसायिक काही वर्षांपासून नाशिक शहरात व्यवसाय करतो. त्याने त्याचा व्यवसाय मुलांच्या हाती सोपवला. दरम्यान, व्यावसायिकाने त्याच्या बँक खात्यांची माहिती व बँक खाती चालवण्यास दुसऱ्या व्यक्तीस अधिकार दिल्याचे समजते. दरम्यान, २३ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर या कालावधीत व्यावसायिक घरी असताना, त्याला संशयित श्रमिक दास शर्मा, मंजू पचिसीया व प्रणय अशा नावांनी भामट्यांनी संपर्क साधला. पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत दामदुप्पट परतावा मिळेल असे आमिष त्यांनी दाखवले. त्यानंतर व्यावसायिकास मोबाईलवर बनावट लिंक पाठवून नामांकित फायनान्सच्या नावे असलेले अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यासाठी व्यावसायिकास दामदुप्पट परताव्याच्या योजना सांगण्यात आल्या. व्यावसायिकाचा विश्वास संपादन करुन एक व्हॉटसअप ग्रुप तयार करुन त्यास ग्रुपमध्ये समाविष्ट केले. संशयितांनी या व्हाट्स अॅप ग्रुपवर इतर गुंतवणूकदारांना कसा आर्थिक फायदा झाला, याबाबतचे बनावट व्हिडीओ पाठवून व्यावसायिकास आर्थिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या अमिषाला भूलून व्यावसायिकाने संशयितांनी सुचविलेल्या विविध बँक खात्यात टप्प्याटप्याने १ कोटी ३६ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
दरम्यान, या फसवणूक प्रकरणात पैसे वर्ग झालेल्या बहुतांश बँक खात्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो सिडको परिसरातील तनय संदेश दत्त (२२, लक्ष्मीनगर, महाराणा प्रताप चौक, सिडको) हा असल्याचे निष्पन्न झाले. व्यावसायिकाने जमा केलेल्या रक्कमेपैकी पाच ते सहा लाख रुपये संशयित दत्तच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी व्यावसायिकासोबत संपर्क साधणाऱ्या, ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले, त्या खातेधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांनी व्यावसायिकास गुंतवणुकीवर कसा आर्थिक परतावा मिळेल याची सविस्तर माहिती पाठवली होती. तसेच पैसे गुंतवल्यानंतर पैसे कसे वाढत आहेत, हे अॅप च्या माध्यमातून दाखवले जात होते. त्यानुसार १ कोटी ३६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल चार कोटी रुपयांचा नफा झाल्याचे व्यावसायिकास दिसले. त्यामुळे त्याने हे पैसे स्वत:च्या बँक खात्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे जमा झाले नाहीत. सखोल चौकशी केल्यानंतर हे अॅप बनावट असल्याचे तसेच आभासी आर्थिक व्यवहार झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.