नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पतसंस्थेतील खातेदाराने तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर खातेदार व पतसंस्थेच्या अध्यक्षांनी कर्जाची रक्कम किंवा गहाण सोने फायनान्स कंपनीला हस्तांतरित न करता फसवणूक केल्याची फिर्याद फायनान्सच्या प्रतिनिधीने दाखल केली आहे.
या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेधारक प्रियंका सुभाषचंद्र जैन (रा. मखलामलाबाद रोड) व अध्यक्ष राहुल बागमार-जैन (रा. मखमलाबाद रोड) यांच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक रावसाहेब पठारे (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार ते मुंबईनाका येथील रूपीक कॅपिटल प्रा. लि.मध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांची कंपनी सोने तारण ठेवून कर्ज देते. प्रियंका जैन हिने रूपीक कंपनीशी ऑनलाइन संपर्क साधत चिरायू पतसंस्थेत तारण ठेवलेले ५०७.९८ ग्रॅम वजनाचे सोने टेकओव्हर करण्याची विनंती कंपनीकडे केली. प्रियंका यांच्या कागदपत्रांची पडताळणी, केवायसी करून प्रियंका जैन यांना मंजूर झालेले १६ लाख दाेन हजार रुपयांचे कर्ज प्रियंका यांच्या बॅंक खात्यात पाठविले. त्यानंतर प्रियंका यांनी कर्जाची रक्कम चिरायू पतसंस्थेतील स्वत:च्या खात्यात वर्ग केली. रूपीक कॅपिटलचे प्रतिनिधी भूषण महाजन हे प्रियंका यांनी पतसंस्थेत तारण ठेवलेले साेने ताब्यात घेण्यासाठी १५ डिसेंबर २०२२ रोजी पतसंस्थेत गेले होते. मात्र, प्रियंका यांच्या तारण सोन्यावर जप्ती आल्याने त्यांनी तारण ठेवलेले सोने व तिने पतसंस्थेत भरलेली रक्कम देऊ शकत नाही, असे चेअरमन राहुल बागमार यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी प्रियंका जैन या त्यांच्या मित्रास जामीनदार झाल्या होत्या. मित्राने कर्ज न फेडल्याने चिरायू पतसंस्थेने प्रियंका जैन यांच्या तारण सोन्यासह बॅंक खात्यातील रकमेवर जप्ती आणल्याचे बागमार यांनी सांगितले. त्यामुळे सोने न मिळाल्याने पठारे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यात चिरायू पतसंस्थेने १६ लाख रुपयांची कर्ज रक्कम स्वत:कडे जमा असतानादेखील ताब्यातील ५०७.९८ ग्रॅम सोने रूपीक कंपनीस हस्तांतरित केले नसल्याची तक्रार होती. प्रियंका जैन व राहुल बागमार यांनी संगनमत करून रूपीक कॅपिटलची फसवणूक करून अपहार केल्याची फिर्याद पठारे यांनी दाखल केली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, म्हसरूळ पाेलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
रुपीक कॅपिटल इंडिया यांनी कर्जदार यांचे कर्ज टेक ओव्हर करताना आमच्याशी कुठलाही पत्रव्यवहार न करता परस्पर कर्ज दिली आहेत. तसेच कर्जदार यांचे सोने न्यायालयाच्या आदेशाने जप्त केले आहे. पंचवटीत दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी न्यायालयाची दिशाभूल करून व सत्य परिस्थिती लपून गुन्हा दाखल करायचा आदेश प्राप्त केला आहे. या संदर्भात संस्था कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करीत आहे.
– डॉ. राहुल बागमार-जैन, अध्यक्ष, चिरायू