नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याने लाखो बालकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. स्वच्छतेमुळे रोगराईचा प्रसारही रोखण्यास मदत झाली आहे.
नाशिक जिल्ह्याने स्वच्छतेच्याबाबतीत आदर्श उभा केला असून, आता शाश्वत स्वच्छतेकडे वळायला आहे. यासाठी स्थानिक पातळीवरील हेवेदावे, गट-तट, पक्षीय राजकारण विसरून विकासासाठी एकत्र यायला हवे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 5) कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार भास्कर भगरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त गेडाम म्हणाले की, आपण जगाच्या तुलनेत पिछाडीवर आहोत यासाठी एकजुटीने काम करायला हवे. पर्यटनस्थळांना भेट देताना पर्यटकांनीही स्वच्छतेचे भान ठेवावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक गाव स्वित्झर्लंडप्रमाणे स्वच्छ करण्यास सांगितले आहे. खा. भगरे म्हणाले, केवळ स्वच्छता अभियानाच्या कामामुळेच मी खासदारपदापर्यंत पोहोचलो. स्वच्छता अभियानातून गावाला विकासाची दिशा प्राप्त होत असल्याने माझे सर्व कुटुंब स्वच्छता अभियानात सामील झाले आहे. सीईओ मित्तल यांनी स्वच्छ भारत अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियानात नाशिक जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली असल्याचे सांगितले. यावेळी 2018 पासूनच्या पुरस्कारप्राप्त 30 ग्रामपंचायतींना या सोहळयात सन्मानित करण्यात आले.
सन 2018-19 शिरसाणे (चांदवड) प्रथम, लोखंडेवाडी (दिंडोरी) द्वितीय, हनुमाननगर (निफाड) व बोरवट (पेठ) तृतीय विभागून.
सन 2019-20 गोंडेगाव (दिंडोरी) प्रथम, शिरसाणे (चांदवड) द्वितीय, शिवडी (निफाड) व नवे निरपूर (बागलाण) तृतीय विभागून.
विशेष पुरस्कार - कोटमगाव (नाशिक), धामनगाव (इगतपुरी) व हनुमाननगर (पेठ).
सन 2020-21 व 2021-22 (एकत्रित स्पर्धा) : पिंपळगाव बसवंत (निफाड) प्रथम, सुळे (कळवण) व नवे निरपूर (बागलाण) द्वितीय विभागून, शिरसाळे (इगतपुरी तृतीय)
ओझरखेड (दिंडोरी), खुंटेवाडी (देवळा), पाहुचीबारी (पेठ).
सन 2022-23 दहिंदुले (बागलाण), राजदेरवाडी (चांदवड), माळवाडी (देवळा).
विशेष पुरस्कार : अंदरसूल (येवला), आघार बु. (मालेगाव), पिंपळगाव बसवंत (निफाड).
सन 2023-24 डाबली (मालेगाव) प्रथम, लाडूद (बागलाण) द्वितीय, उंबरखेड (निफाड) तृतीय.