नाशिक : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, पाणी घरात शिरणे, घर, जुन्या वाड्याची पडझड आदी स्वरूपाच्या १६ तक्रारी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. (Show cause notices have been issued to the absent employees through the Disaster Management Department.)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालयांत आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केला आहे. २४ तास सुरू राहणाऱ्या या कक्षात तीन सत्रांत कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. आग, अपघात, पूर परिस्थिती, झाडे पडणे, घर पडणे व नैसर्गिक आपत्ती आदी परिस्थिती उद्भवल्यास आपत्कालीन नियंत्रण कक्षास या हेल्पलाइन क्रमांकावर ०२५३- २२२२४१३ माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात गोदावरीसह उपनद्यांना पूर येतात. अशा परिस्थितीत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे, विविध विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती मदत आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या कक्षाची आहे. शुक्रवारपासून (दि.२) संततधार सुरू असलेल्या पावसाने शनिवारी (दि.३) आणि रविवारी (दि.४) मुसळधार हजेरी लावली. त्यात शहरात अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड होणे, फांद्या तुटणे, पाणी साचणे अशा घटना घडल्या. या संदर्भातील १६ तक्रारी निकाली काढण्यात आल्याचा दावा अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी केला आहे.
गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या घटनेनंतर रविवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजता आयुक्त डॉ. करंजकर यांनी अचानक आपत्कालीन कक्षाला भेट दिली. त्यावेळी या कक्षात नियुक्त असलेले कनिष्ठ लिपिक रूपचंद ताठे व कनिष्ठ अभियंता गोसावी उपस्थित नसल्याचे आढळले. ही बाब गांभीर्याने घेत दोन कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.