नाशिक : तांत्रिक बिघाडामुळे मागील आठवडाभरापासून बंद असलेली नाशिक-दिल्ली व नाशिक-इंदूर ही विमानसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. प्रारंभी तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, एचएएल व्यवस्थापनाने तत्काळ याबाबत उपाययोजना केल्याने, अवघ्या आठच दिवसांत सेवा पूर्ववत झाली आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीकडून नवी दिल्लीसह अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा, इंदूर, जयपूर व बंगळुरू या शहरांसाठी सेवा दिली जाते. त्यात दिल्लीसाठी नियमित सेवा असून, इंदूरसाठी आठवड्यातून तीन दिवस सेवा दिली जात आहे. मात्र, अचानकच तांत्रिक बिघाड झाल्याने, गेल्या २७ डिसेंबर २०२४ पासून या सेवा पूर्णत: बंद करण्यात आल्या होत्या. तर तांत्रिक बिघाडाचा परिणाम बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर व गोवा या फ्लाइटच्या वेळापत्रकावर झाला होता. या व्यत्ययाची कारणे अनपेक्षित तांत्रिक समस्या असल्याने, ती केव्हापर्यंत सोडविली जाणार याबाबतचे उत्तर कोणाकडेही नव्हते.
तथापी एचएएल व्यवस्थापनाने तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या. एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, महाव्यवस्थापक सुब्रत मंडल, विमातळ संचालक विलास आव्हाड यांनी तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने, अवघ्या आठवडाभरात तांत्रिक बिघाड दूर होवून सेवा पूर्ववत झाली आहे. दरम्यान, सेवा पूर्ववत झाल्याने नाशिकहून दिल्ली तसेच इंदूर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली आणि इंदूर विमानसेवा खंडीत झाल्याने, त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे. मागील वर्षी २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेत ७६ हजार ७८९ प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतल्याची नोंद झाली. नवी दिल्ली आणि इंदूर ही सेवा खंडीत झाली नसती तर हा आकडा लाखांच्या पार असता, असे मत निमा एव्हीएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी व्यक्त केले.