नाशिक : नाशिकमध्ये आधीच महाग झालेल्या फ्लॅटच्या दरात वाढीव रेडीरेकनरमुळे आणखी वाढ झाली आहे. सातपूर, गोळे कॉलनी, कॅनडा कॉर्नर, आडगाव, महात्मानगर येथे रेडीरेकनरचे दर १० टक्क्यांनी वाढल्याने फ्लॅटच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील. तर कामटवाडा, नाशिक रोड येथे रेडीरेकनर तुलनेने कमी वाढ झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळेल. नव्या दरपत्रकानुसार शहरात स्क्वेअर फुटामागे २५० ते ३५० रुपये वाढ झाली असून, त्यामुळे ग्राहकांना फ्लॅटसाठी दीड ते दोन लाख अधिकचे मोजावे लागणार आहेत.
नाशिकला परवडणाऱ्या घरांचे शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र हे चित्र पालटले आहे. पूर्वी १२-१५ लाखांत मिळणारे फ्लॅट आता १८-२० लाखांपर्यंत पोहोचले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अगोदर अधिकचा दर असलेल्या काही भागात तरी रेडीरेकनर दर न वाढवण्याची मागणी केली होती, पण सरसकट सर्वत्र वाढ करण्यात आल्याने आता दर गगणाला भिडणार आहेत. सातपूर, आडगावसह झपाट्याने वाढणाऱ्या भागात १० टक्के दरवाढ झाली आहे. गोविंदनगर (९.२३ टक्के), मोतीवाला नगर (९.२ टक्के), अंबड (८.५ टक्के), मखमलाबाद (८.१ टक्के), म्हसरूळ (७.७१ टक्के) येथेही दर वाढले आहेत. आधीच महाग असलेल्या गंगापूर रोड परिसरात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे.
आनंदवली पाइपलाइन रोडला मात्र रेडीरेकनरच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ केली गेली नाही. याठिकाणी पूर्वी ५१ हजार स्क्वेअर मीटर इतका दर होता. तो कायम ठेवला आहे. या परिसरात बांधकामाला जास्त वाव नसल्याने, दर शून्य ठेवल्याचा फारसा परिणाम होणार नाही.
रेडीरेकनर दर वाढल्यास त्याचा परिणाम महापालिका कर वाढीवर होतो. विकास दर आणि लेबर सेसमध्ये रेडीरेकनर दरवाढीचा मोठा परिणाम होणार आहे. याचा भुर्दंड ग्राहकांवर पडणार असल्याने, सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येणार आहेत.
अगोदरच शहरात घरांच्या किंमती अधिक आहेत. त्यामुळे रेडीरेकनर दरवाढ करू नये, अशी आमची मागणी होती. दरवाढीमुळे घरांच्या किंमती वाढणार आहेत. दरवर्षी शहरात १८ हजार फ्लॅटची विक्री होते. विक्रीची गती कमी होण्याची शक्यता आहे.सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको, नाशिक.