नाशिक : राज्य शासनाने मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातून सर्वत्र बटुकली म्हणजे ५ ते ८ सेंटीमीटर लांबीचे मत्स्य बीज उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून मासे उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शासनाने वेगवेगळ्या ठिकाणी संचयन केंद्रांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली असून नाशिक विभागात गेल्या तीन वर्षांत तब्बल सात हजार ८०७ मॅट्रिकटने उत्पादनात वाढ झाली आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे की, एक किलो वजन होईपर्यंत मासे पकडण्यास मनाई असेल. लहान माशांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. मासा मोठा झाल्याने प्रजननही जास्त प्रमाणात होते. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मत्स्य व्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळाल्याने वीजदरही कृषी दराने देण्यात येत आहेत. तसेच, किसान क्रेडिट कार्ड योजनेतून मत्स्य व्यवसायिकांना चार टक्के व्याज परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
गेल्या तीन वर्षांत नाशिक विभागात मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३ मध्ये उत्पादन १० हजार ३५६.९ मेट्रिक टन होते, तर २०२४ मध्ये ते वाढून १६ हजार ११२ मेट्रिक टन झाले. याच गतीने २०२४/२५ मध्ये १८ हजार १६३ मेट्रिक टन उत्पादन झाले असून तीन वर्षांत तब्बल आठ हजाराच्या जवळपास उत्पादनात वाढ झाली आहे. तर सध्या नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ६९४४.६ मे.टन मत्स्य उत्पादन होत आहे
मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने विविध योजना सुलभ केल्या आहेत. किसान क्रेडिट कार्डमार्फत चार टक्के परताव्याचा लाभ मिळतो. जास्तीत जास्त मत्स्य व्यावसायिकांनी या योजनांचा फायदा घ्यावा.किसन वाघमारे, मत्स्य व्यवसाय प्रभारी सहाय्यक आयुक्त
नाशिक जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन क्षेत्र
तलाव संख्या - ६५
जलक्षेत्र हेक्टर मध्ये - १७,६३७
एकूण संस्था - ५१
एकूण मच्छीमार - ५३४२
मत्स्य उत्पादन ( मे. टन)- ६९४४.६