नाशिक : शरणपूर रोड येथील बेथेलनगर गोळीबाराच्या घटनेतील मुख्य आरोपी राहुल पवारला अटक करण्यात क्राइम ब्रँच युनिट क्र. १ यांना यश मिळाले आहे. पवार याचा पोलिसांनी १० किलोमीटर पाठलाग करत नांदगाव येथून ताब्यात घेतले. अत्यंत शिस्तबद्ध व गोपनीयरित्या राबवलेल्या या मोहिमेत चित्रपटाप्रमाणे थरारक पाठलाग करत पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बाेधलेनगर येथे राहुल पवार व त्याच्या ५ ते ६ साथीदारांनी ३ नोव्हेंबरला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर राहुल पवार याचा शोध सुरू होता. अंमलदार राहुल पालखेडे, हवालदार महेश साळुंके आणि तांत्रिक विश्लेषण आप्पा पानवळ, नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार राहुल पवार नांदगाव परिसरात फिरत असल्याचे समजले.
सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने दोन दिवस नांदगाव परिसरातील शेतमळे व इतर लोकवस्तीच्या ठिकाणी वेशांतर करत शोध घेतला. पोलिसांची चाहूल लागताच तो दुसऱ्या जिल्ह्यात पसार होण्याच्या बेतात होता. पथकाने गावकऱ्यांच्या वेशात सापळा रचत दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना १० किमीपर्यंत पाठलाग करत ताब्यात घेतले. या कारवाईत उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, किरण शिरसाठ, हवालदार उत्तम पवार, नितीन जगताप, गोरक्ष साबळे, राम बर्डे, उत्तम खरपडे, अनुजा येलवे, समाधान पवार यांनी भाग घेतला.