पंचवटी (नाशिक) : पेठ रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत रविवारी, (दि २०) दुपारी आग लागल्याने तब्बल नऊ रिक्षा व दोन चारचाकी असे अकरा वाहने जळून खाक झाली आहेत.
नाशिक शहरात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, आग नक्की कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पेठ रोडवरील एस टी कार्यशाळेतील आग शॉट सर्किट झाल्याने आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती काढताच पंचवटी अग्निशामक दलाच्या दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
पेठ रोडवरील घटनेत जळालेल्या नऊ रिक्षा, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक स्विफ्ट डिझायर अशी अकरा वाहने नाशिक आरटीओने विविध गुन्ह्यात जप्त केल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत माहिती अशी की, पेठरोड परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कार्यशाळा असून कार्यशाळेच्या मोकळ्या जागेत आरटीओ कारवाई करण्यात आलेली वाहने लावली जातात. रविवारी (दि.20) रोजी दुपारी कार्यशाळेच्या आवारात गवतात उभ्या असलेल्या वाहनांच्या ठिकाणी धूर निघू लागला आणि काही वेळात या ठिकाणावरील झाडाचा पाचोळा पेटल्याने वाहने आगीच्या भक्ष्य स्थानी सापडली. सदर आग कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. सदर घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने आग विजविण्यात आली.
यावेळी पंचवटी अग्निशमन दल प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, संतोष मेहेंदरे, मनोहर गायकवाड, विजय शिंदे, विजय पाटील व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
सध्या उष्णतेचा पारा वाढल्याने शहरात सातत्याने आगीच्या घटना घडत असून गुरुवारी (दि १७) रोजी मध्यरात्री तपोवन परिसरातील मारुती वेफर्स जवळील प्लायवूडच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर शुक्रवारी (दि १८) रोजी छत्रपती संभाजी महाराज नगर रस्त्यावरील कपालेश्वर नगर येथे फर्निचरच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली होती. तर याच दिवशी काही वेळात याच रस्त्यावरील जयशंकर लॉन्समोरील मोकळ्या शेतातील गवताला आग लागण्याची घटना घडली होती. तर रात्री काही वेळात ट्रॅक्टर हाऊस समोरील उड्डाणपुलावर चार चाकी गाडीने पेट घेतल्याची घटना घडली होती.