नाशिक : महाराष्ट्र अग्निसंरक्षा अभियान योजनेंतर्गत इंदिरानगर व गंगापूर येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची महापालिकेची मागणी नगरविकास विभागाने मान्य केली असून, यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय मुंबईमार्फत शासनाला विनाविलंब सादर करावा, असे निर्देश शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
इंदिरानगर आणि गंगापूर या दोन्ही ठिकाणी स्वतंत्रपणे नव्या अग्निशमन केंद्रांची स्थापना करण्याची मागणी नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. नाशिक महापालिका क्षेत्राचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता तसेच शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच नव्या वसाहती, औद्योगिक क्षेत्रे व व्यापारी संकुले वाढत आहेत.
इंदिरानगर, वडाळा ते पाथर्डी रोड परिसरात तसेच गंगापूर रोडवर गंगापूर गावापर्यंत उंच वसाहती तसेच गृह प्रकल्प निर्माण होत आहेत. दोन्ही ठिकाणच्या परिसराचा विकास वेगाने होत आहे. या दोन्ही ठिकाणी जवळपास एकही अग्निशमन केंद्र अस्तित्वात नाही. त्यामुळे नवीन नाशिक अथवा शिंगाडा तलाव अग्निशनमन केंद्र येथील बंब आग, अपघातप्रसंगी येत असतात. परंतु, इंदिरानगर ते शिंगाडा तलाव सिडको तसेच गंगापूर गाव, सोमेश्वर, सिरीन मेडोज हे अंतर जास्त असल्याने तसेच रहदारीमुळे अग्निशमन बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इंदिरानगर-वडाळा शिवारात अग्निशमन केंद्राची स्थापना करणे आवश्यक असल्याचे आ. फरांदेंनी पत्रात म्हटले आहे.
नवीन अग्निशमन केंद्राच्या अनुषंगाने शासनाने परिपूर्ण अहवाल मागवला आहे. त्यासाठी लागणाऱ्या जागेविषयी मनपा नगररचना विभागाकडे पत्रव्यवहार करून जागेची मागणी करण्यात येणार आहे.संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा
आठ अग्निशमन केंद्रांची गरज
नाशिक शहरात सद्यस्थितीत नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, सातपूर, पंचवटी व नाशिकरोड या सहा विभागांत प्रत्येकी एक अशी एकूण सहा अग्निशमन केंद्रे कार्यान्वित आहेत. १० चौ.मी. किंवा १ लाख लोकसंख्येमागे किमान एक अग्निशमन केंद्र असावे, अशी तरतूद आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार नाशिक शहरात आणखी आठ नवीन अग्निशमन केंद्रांची शहराला आवश्यकता आहे.