नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिकमधील तपोवन येथील लोकेश लॅमिनेट्स प्लायवूड कारखान्यात मोठी आग लागली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सर्व केंद्रांमधून प्रत्येकी तीन अशा सुमारे 18 अग्निशमन गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. सिन्नर एमआयडीसी, चांदवड अंबड एमआयडीसी आणि करन्सी नोट प्रेसकडून अतिरिक्त मदत मागवण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अग्निशमन गाड्या देखील आग विझवण्याच्या प्रयत्नात आहेत.
अग्निशमन दलाचा आठवडा साजरा होत आहे. अशावेळी नाशिकमधील तपोवन येथील लोकेश लॅमिनेट्स प्लायवूड या कारखान्यात मोठी आग लागली आहे. ज्यामुळे अग्निशमन दलांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आग इतकी भीषण आहे की, संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोळ उठत आहेत. गुरुवार (दि.17) रोजी मध्यरात्री 12:15 वाजता प्लायवूड या कारखान्याला आग लागली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस प्रशासनानेही मदत आणि बचाव कार्यात कसोशीने प्रयत्न करत आहेत.
अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत परंतु परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. प्लायवुडचा मोठा साठा असलेल्या गोदामात ही आग लागल्याने मोठे नुकसान झाले असून सर्व मालमत्ता खाक झाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या 10 ते 12 अग्निशमन दलाच्या वाहनांकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.