सिन्नर : सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगरावर रविवारी (दि. ८) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्याची घटना घडली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून खाक झाली असून जैवविविधतेची मोठी हानी झाली आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच जय भवानी लॉन्सचे संचालक सोपान बोडके यांनी सोनांबे गावातील वृक्षप्रेमी मित्र तसेच सिन्नर शहरातील वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना याबाबत कळवले. माहिती मिळताच सर्व स्वयंसेवकांनी डोंगराकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
या आगीत वनप्रस्थ फाउंडेशनने लावलेली सुमारे ६ हजार झाडे जळून गेली, तर वनविभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेली ७ हजारांहून अधिक झाडेही आगीत भस्मसात झाली. केवळ झाडेच नव्हे तर या परिसरात वास्तव्यास असलेले अनेक लहान-मोठे कीटक, प्राणी व पशुपक्षीही आगीत जळून गेल्याने जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच डोंगरावरील झाडांसाठी बसवण्यात आलेली ड्रिप लाईन व पाण्याची पीव्हीसी पाईपलाईनही जळून खाक झाली असून पुढील काळात झाडांना पाणीपुरवठा करणे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, आग विझवल्यानंतर स्वयंसेवकांनी एकत्र येत झालेल्या नुकसानीची पर्वा न करता अधिक जोमाने वृक्षसंवर्धनासाठी एकजूट होण्याचा निर्धार केला. आग विझविण्याच्या कामात राजेंद्र क्षत्रिय, अभिजित देशमुख, अनिल जाधव, समाधान बोडके, संदीप महावीर खिंवसरा, दत्तात्रय बोऱ्हाडे, विनोद रोकडे, किरण खिंवसरा, मनोज भंडारी, चंद्रभान वरुंगसे, राणू घोडे बाबा, धीरज बोडके, राहुल पवार, जगदीश बोडके, कुणाल बोडके, अभिषेक पवार यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले. याशिवाय सिन्नर नगरपरिषद व मुसळगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या व कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी मोठे योगदान दिले.
नऊ वर्षांच्या मेहनतीवर पाणी...
वनप्रस्थ फाउंडेशन व स्थानिक स्वयंसेवकांनी गेल्या नऊ वर्षांपासून आई भवानी डोंगरावर वृक्षारोपण व संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून डोंगरावर सुमारे १० हजार ५०० वृक्षरोपे लावण्यात आली होती. त्यापैकी जवळपास ९५ टक्के झाडे जिवंत ठेवण्यात स्वयंसेवकांना यश आले होते. मात्र दुपारच्या कडाक्याच्या उन्हात आणि जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली.